news
Home पिंपरी चिंचवड ‘मुख्याध्यापकांची शिफारस, तरीही कामावरून काढले’; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य दारावर आमरण उपोषण!

‘मुख्याध्यापकांची शिफारस, तरीही कामावरून काढले’; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य दारावर आमरण उपोषण!

मंदाकिनी काळे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; दोषी ठेकेदार अन् सुपरवायझरवर कारवाईची मागणी, कंत्राटी कामगारांत संताप | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महिला सफाई कामगाराचे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण; आंदोलनाचा दुसरा दिवस, प्रशासनाची उदासीनता!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत भोसरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात काम करणाऱ्या एका कंत्राटी महिला सफाई कामगाराने अन्यायाविरोधात महापालिकेच्या मुख्य प्रवेशदरासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडला तरी महापालिका प्रशासन किंवा संबंधित ठेकेदार संस्थेकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

सौ. मंदाकिनी सागर काळे या ‘मे. स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि.’ या ठेकेदार संस्थेमार्फत भोसरी येथील महापालिकेच्या शाळेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्यात आले.
त्यांच्या जागी नवीन कामगारांची भरती करताना प्रत्येकी २५,००० रुपयांची लाच उकळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, नियमानुसार किमान वेतन न देता केवळ ८,००० रुपये देऊन बोळवण करणे, वेतनाची स्लिप किंवा बोनस न देणे आणि सुपरवायझर विज्यु पुनवळे व रतन काळे यांच्याकडून जातीवाचक व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही मंदाकिनी काळे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित महिला कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पाठबळ दिले आहे. मुख्याध्यापकांनी दिलेल्या लेखी दाखल्यानुसार सौ. मंदाकिनी काळे यांचे काम अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि समाधानकारक आहे. त्या दररोज वेळेवर शाळेत उपस्थित राहतात आणि त्यांचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी वर्तन अत्यंत नम्र व उत्तम आहे. त्यांच्याविरुद्ध शाळेकडे कधीही कोणतीही तक्रार आलेली नाही; उलटपक्षी त्यांना पुन्हा पूर्ववत कामावर सामावून घेण्याची अधिकृत शिफारस शाळेने केली आहे.

 

आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळण्यासाठी आणि जुन्याच जागेवर पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी मंदाकिनी काळे यांनी महापालिका प्रशासनाला ७ दिवसांचा अंतिम इशारा (अल्टीमेटम) दिला होता. मात्र मुदत संपूनही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशदरासमोर आमरण उपोषण सुरू केले.
आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही महापालिका प्रशासन अथवा ठेकेदाराने त्यांची साधी विचारपूसही केलेली नाही. जोपर्यंत आपल्याला मूळ जागेवर पुन्हा कामावर घेतले जात नाही आणि दोषी ठेकेदार व सुपरवायझरवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार मंदाकिनी काळे यांनी व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!