26
केएसबी चौकातील छत्रपती शाहू महाराज स्मारकाची दुरवस्था; प्रशासनाचा निषेध करत सनय छत्रपती शासन पक्षाचे २३ ऑगस्टला ‘गवत उपटो’ आंदोलन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील केएसबी चौकात कोट्यवधी रुपये खर्च करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे अत्यंत भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र, पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि दुर्लक्षामुळे सध्या या स्मारकाची अत्यंत विदारक दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीविरोधात आणि शिवप्रेमींच्या भावनांचा अनादर रोखण्यासाठी सनय छत्रपती शासन पक्षाच्या वतीने आज (रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता स्मारकाच्या परिसरात ‘गवत उपटो’ आंदोलन व परिसर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या आंदोलनात पक्षाचे राष्ट्रीय पक्षप्रमुख प्रा. नामदेवराव जाधव हे स्वतः उपस्थित राहून आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
केएसबी चौकातील छत्रपती शाहू महाराज स्मारकाची दुरवस्था पाहून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त, शाहूप्रेमी आणि जागरूक नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. स्मारकाची भिंत अत्यंत धोकादायक झाली असून ती कधीही कोसळू शकते. स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात प्लास्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. उद्यानात उसापेक्षाही उंच घनदाट गवत वाढल्यामुळे आणि परिसरात एकांत असल्यामुळे हा भाग मद्यपी, गर्दुल्ये व असामाजिक घटकांचा अड्डा बनला आहे. यामुळे भविष्यात महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि या स्मारकाची स्वच्छता राखण्यासाठी ‘गवत उपटो’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वच्छता मोहिमेदरम्यान परिसरातून उपटलेले सर्व गवत आणि चारा परिसरातील गोशाळेत गोमातांसाठी पाठवून एक उत्तम राष्ट्रकार्य केले जाणार आहे.
सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय पक्षप्रमुख प्रा. नामदेवराव जाधव हे आपल्या प्रखर विचारांनी आणि छत्रपती शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेच्या स्पष्टवक्त्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. जनसामान्यांच्या हक्कासाठी आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी ते सातत्याने मैदानात उतरून लढा देत आहेत.
प्रा. नामदेवराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो तरुण-तरुणी, महिला, नागरिक आणि छत्रपती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
