साध्या राहणीमानासह छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प.
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहराचे महापौर रवी लांडगे यांनी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि राजकीय प्रवासावर दिलखुलास गप्पा मारल्या. या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी केवळ पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा ध्यासच मांडला नाही, तर आपल्या बालपणीच्या आठवणी, कौटुंबिक राजकीय वारसा आणि दैनंदिन आयुष्यातील शिस्तीवर प्रकाश टाकला.
दरम्यान बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले की, त्यांना राजकारणाचे आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांचे चुलते कै. अंकुशराव लांडगे यांनी लहानपणापासून त्यांच्यावर विचारांचे संस्कार केले. अंकुशराव लांडगे यांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांच्यावर कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी आली.
“आम्ही जेव्हा जेलमध्ये होतो, तो काळ खूप कष्टाचा आणि दुःखाचा होता. एका बाजूला चुलत्यांची हत्या झाल्याचे मोठे दुःख होते आणि दुसरीकडे परिस्थितीशी संघर्ष करायचा होता,” अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पालिकेच्या महापौरपदाची धुरा सांभाळताना शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणी व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडे जाऊन रवी लांडगे यांनी आपल्या फिटनेस आणि आहाराबाबत रंजक माहिती शेअर केली. सुमारे १० वर्षांपूर्वी फिटनेसविषयी गांभीर्याने विचार करत १६ आठवड्यांच्या कडक शिस्तीत सिक्स पॅक डाएट आणि वर्कआउट पूर्ण केल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. अत्यंत साधे राहणीमान पसंत असणाऱ्या रवी लांडगे यांना सुकामेवा किंवा फास्ट फूडपेक्षा घरातील गरमागरम भाकरी, हिरव्या भाज्या (मेथी, पालक, शेपू) आणि सात्त्विक तुपातला मसाले भात सर्वाधिक आवडतो. शहरात अनेकदा सायकलवरून प्रवास करून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा आणि जनसामान्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्य स्थापनेची पवित्र शपथ घेतली, त्या ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प आपल्या संपूर्ण मित्रपरिवाराने आणि ग्रुपने केला असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी यावेळी अभिमानाने नमूद केले. हा उपक्रम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
अखेरीस संदेश देताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “९९.९९ टक्के लोक एकसारखेच आयुष्य जगतात; परंतु आपल्याला त्या उरलेल्या ०.०१ टक्क्यात जाऊन ‘लार्जर दॅन लाईफ’ जगायचे आहे. तुमच्याकडे किती गाड्या, बंगले किंवा पैसे आहेत याला महत्त्व नाही, तर तुम्ही ज्या क्षणात जगताय आणि तुमच्यामुळे किती लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येतोय, हेच आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.”
© २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS. सर्व हक्क राखीव.
