47
गळ्यातील मंगळसूत्र फेकत असहाय्य आईची आर्त हाक ठरली निष्फळ; छत्रपती संभाजीनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी दि. २२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका १६ वर्षीय मुलाच्या हट्ट आणि मानसिक अस्वस्थतेमुळे संपूर्ण कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्वतःचे आयुष्य संपवण्यासाठी डोंगराच्या कड्यावर गेलेल्या लेकाला वाचवण्याच्या धडपडीत आई आणि वडिलांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
दहावीत ९२ टक्के गुण मिळवून अकरावीत प्रवेश घेतलेला कुणाल चांदगुडे गेल्या काही दिवसांपासून घरात वाद घालू लागला होता. हट्ट आणि मानसिक तणावातून तो थेट खवड्या डोंगराच्या टोकावर जाऊन उभा राहिला.
आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दारात पाहून असहाय्य झालेल्या आईने गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकत अतिशय कारुणिक हाक मारली, “तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते. तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते. आपण दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस…”
परंतु, नैराश्याने ग्रासलेल्या कुणालने आईच्या या आर्त हाकेकडे दुर्लक्ष केले आणि “आई, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही” असे सांगत १५० ते २०० फूट खोल दरीत उडी घेतली. त्याला वाचवण्याच्या भरात आणि आघातात आई-वडीलही त्याच्यापाठोपाठ दरीत कोसळले.
भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याचा आणि त्याच्या वडिलांचा वाद सुरू होता. वडिलांकडून खर्चाला पैसे न मिळणे आणि महागड्या आयफोन मोबाईलचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात घर करून बसली होती. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने स्वतःचा महागडा आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी डोंगरावरच काढून फेकून दिली.
अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील रहिवासी असलेले चांदगुडे कुटुंब शहरात गेल्या १८ वर्षांपासून वास्तव्यास होते. दहावीत उत्तम गुण मिळवणाऱ्या मुलाच्या क्षुल्लक हट्टामुळे आणि सहनशीलता संपल्यामुळे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. या घटनेने आजच्या युवा पिढीतील ढासळती सहनशक्ती आणि बदलत्या मानसिकतेवर अत्यंत भीषण प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
