29
जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश वाटप; लवकरच साडेतीनशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडणार — अध्यक्ष राजेंद्र हजारे
सोलापूर, प्रतिनिधी दि. २२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सोलापूर: सर्व ठेवीदार, सभासद आणि खातेदारांच्या विश्वासाच्या जोरावर जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूरने २०२५ आणि २०२६ या आर्थिक वर्षांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यंदा सर्व सभासदांना १३ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असून, संस्था लवकरच ३५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी केली.
सोलापूर येथील श्री टाकळीकर मंगल कार्यालयात जनकल्याण मल्टीस्टेटची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे उपस्थित होते.
वार्षिक सभेमध्ये माहिती देताना अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी संस्थेच्या मजबूत आर्थिक स्थितीचा ताळेबंद मांडला. मार्च २०२६ अखेर संस्थेने पावणेतीनशे कोटी रुपयांच्या (२७५ कोटी) ठेवींचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला आहे. मार्च अखेर १९८ कोटी ९१ लाख ७६ हजार ४७५ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, ९१ कोटी ३ लाख ९८ हजार ४४१ रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी ७१ लाख ७ हजार ६७७ रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेचा एनपीए (थकीत कर्ज) अवघा १ टक्का असून संस्था अत्यंत सुरक्षित स्थितीत आहे.
सध्या जनकल्याण मल्टीस्टेटच्या वतीने वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, महिला बचत गट कर्ज, सोने तारण आणि ऊस वाहतूक-तोडणी कर्ज अशा विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत.
जनकल्याण मल्टीस्टेटच्या सध्या विविध तालुक्यांमध्ये २७ शाखा कार्यरत आहेत. आगामी काळात मंगळवेढा, सोलापुरातील जुनी विडी घरकुल, निर्मिती विहार परिसर, शेळगी, कुंभारी आणि वळसंग येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मानस हजारे यांनी व्यक्त केला. व्यावसायिक प्रगतीसोबतच संस्थेने सामाजिक दायित्वही जपले आहे. सीना नदीकाठच्या पूरग्रस्तांना तत्पर मदत पुरवण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० मान्यवरांना ‘जनकल्याण गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाते.
या सभेस मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे, उपाध्यक्ष संजय जावळे, संचालक पंडित बुळगुंडे, विजय डांगे, नितीन कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, अमरसिंह देशमुख, कल्याण राऊत, लक्ष्मीकांत जाधव, रणजित हजारे, सचिन कट्टे, तानाजी तानगावडे, वर्षा विभुते, प्रियांका पाटील, गवळण गायकवाड यासह संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते.
सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी अध्यक्ष राजेंद्र हजारे व सीईओ आशा हजारे यांच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सुरवसे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
