news
Home पिंपरी चिंचवड पीसीसीओईआरमध्ये ‘ASIACONF २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद थाटात; मानवी बुद्धिमत्ता अन् एआयच्या समतोलावर भर!

पीसीसीओईआरमध्ये ‘ASIACONF २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद थाटात; मानवी बुद्धिमत्ता अन् एआयच्या समतोलावर भर!

'आयईईई' महाराष्ट्र सेक्शनच्या सहकार्याने तीन दिवसीय आशियाई परिषदेचे रावेत येथे उद्घाटन; स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अभियंते हेच राष्ट्रनिर्माणाचे खरे शिल्पकार — डॉ. प्रमोद पाटील; पीसीसीओईआरमध्ये ६ व्या आशियाई परिषदेचे प्रथम सत्र संपन्न!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

रावेत / पिंपरी: “कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) या प्रगत तंत्रज्ञानाकडे मर्यादित कल्पना असू शकतात. मात्र, मानवाने स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवून काम केले, तर ते खऱ्या अर्थाने ‘आउट ऑफ द बॉक्स’ म्हणजेच नावीन्यपूर्ण ठरू शकते. आपल्या मानवी मेंदूला ज्या नवनवीन कल्पना सुचू शकतात, त्या एआयला सुचणे शक्य नाही. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण उद्याचे अभियंते हेच राष्ट्रनिर्माणाचे खरे शिल्पकार आहेत,” असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे संशोधन संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) रावेत येथील ‘पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च’ (PCCOER) च्या वतीने आणि ‘आयईईई’ (IEEE) महाराष्ट्र सेक्शनच्या सहकार्याने आयोजित “एशियन कॉन्फरन्स ऑन इनोव्हेशन इन इमर्जिंग टेक्नॉलॉजी” (ASIACONF) २०२६ या ६ व्या तीन दिवसीय आशियाई परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रमोद पाटील बोलत होते. या वेळी परिषदेच्या विशेष स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले.

या सोहळ्यास मुंबईतील ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे डॉ. शशिकांत पाटील, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. केतन कोटेचा, पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, उद्योजक जयेश जगताप, महाराष्ट्र सेक्शन वाईस चेअर डॉ. सौरभ सोनी, डॉ. प्रमोद बिडे, वाईस चेअर इंडिया कौन्सिल डॉ. चाणक्य झा, समन्वयक डॉ. राहुल मापारी, पीसीसीओईआरचे ई अँड टीसी विभाग प्रमुख डॉ. किरण नाप्ते आणि डॉ. विजयलक्ष्मी कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. प्रमोद पाटील पुढे म्हणाले की, “आज जगभरात एआयचा वापर केवळ ५ टक्के होत असून ९५ टक्के क्षेत्र अजूनही प्रतीक्षेत आहे. त्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. ई-कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर (Recycling) आणि अपसायकलिंगसाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. एआयद्वारे तयार केलेले ७० टक्के प्रकल्प नाकारले जातात; त्यामुळे आधी मानवी मेंदूने स्वतःहून काम करणे व संशोधन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

 “संशोधनाच्या क्षेत्रात एआयचा वापर हा केवळ साधन नसून समाजाच्या समस्या सोडवणारी ‘नवनिर्मिती’ असावी. समस्यांचे व्यावहारिक व सुलभ उत्तर शोधणे म्हणजेच खरी नवनिर्मिती होय.”  डॉ. हरीश तिवारी (संचालक, PCCOER)
“न्यूरो-सिम्बॉलिक एआय आणि कॉझल (कार्यकारणभाव आधारित) एआयच्या साहाय्याने समाजातील ९९ टक्के जटिल समस्यांवर उपाय शोधता येऊ शकतात.” – डॉ. केतन कोटेचा

 

“आयईईई ही जगभरातील ५ लाखांहून अधिक सदस्य असलेली संस्था असून शिक्षण, संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनात मोठे योगदान देत आहे.” – डॉ. शशिकांत पाटील

 

“एका स्मार्टफोनच्या विकासात १२ पेक्षा जास्त संशोधकांचे योगदान आहे, आपणही अशीच प्रभावी व क्रांतिकारी प्रणाली विकसित केली पाहिजे.” – डॉ. दिनेश अमळनेरकर

 

“अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी शेती व अन्नाला कोणताही डिजिटल पर्याय नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रात एआयचा वापर अत्यंत विचारपूर्वक व मर्यादित स्वरूपात व्हावा.” – जयेश जगताप (उद्योजक)

 

सदर परिषदेचे आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. राहुल मापारी यांनी केले, प्रास्ताविक चाणक्य झा यांनी मांडले, तर सूत्रसंचालन डॉ. विजया यदुवंशी यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. किरण नाप्ते यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!