22
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा डोमा आश्रमशाळेत मुक्काम; आदिवासी समुदाय लढवय्याच, अंधश्रद्धेला जीवनात थारा देऊ नका!
अमरावती , प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ०४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज
अमरावती / चिखलदरा: भगवान बिरसा मुंडा व क्रांतीसूर्य तंट्या भिल्ल यांसारख्या लढवय्या महापुरुषांचा वारसा लाभलेला आदिवासी समाज प्रसंगी मेळघाटात वाघ व अस्वलांशी दोन हात करायला घाबरत नाही. याच लढवय्या प्रवृत्तीची आठवण ठेवत विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेला दूर सारून शिक्षणाची कास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून पुढे जावे, असा संदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिला. तसेच अंधश्रद्धेला भीक न घालता आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कथित भुताटकीच्या अफवांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही भीती दूर करण्यासाठी आणि अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी (१ सप्टेंबर) आश्रमशाळेला भेट देऊन थेट तेथेच रात्रीचा मुक्काम ठोकला.
या उपक्रमात आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि उपविभागीय अधिकारी किसन तडवी यांच्यासह संपूर्ण तालुका प्रशासनाने सहभाग घेतला. प्रशासनाच्या या संवेदनशील आणि धाडसी पावलामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होण्यास मोठी मदत झाली आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत जेवण केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मित्रांसारखे विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. शालेय जीवनात एका आयएएस अधिकाऱ्याच्या भेटीने प्रभावित होऊन आयएएस होण्याचा कसा निश्चय केला, याचा रंजक प्रवास त्यांनी सांगितला. – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
केवळ कला शाखेची (BA) पदवी असूनही केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती व कष्टाच्या जोरावर आयएएस होता येते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. – सत्यम गांधी व सिद्धार्थ शुक्ला
या वेळी प्रसिद्ध खंजिरी वादक संदीपपाल महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधनात्मक सादरीकरण केले. तसेच आश्रमशाळेत मुलींसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


