news
Home पिंपरी चिंचवड ‘त्या ठेकेदाराचे नाव द्या, त्याला जिवंत जाळीन’; भाजप नगरसेविका शैलजा मोरे यांच्या विधानाने पिंपरी पालिकेत खळबळ!

‘त्या ठेकेदाराचे नाव द्या, त्याला जिवंत जाळीन’; भाजप नगरसेविका शैलजा मोरे यांच्या विधानाने पिंपरी पालिकेत खळबळ!

निगडी स्मशानभूमीतील दुरवस्थेवरून प्रशासनाला धारेवर धरताना भाषेची मर्यादा ओलांडली; पुत्राकडून भावनांच्या भरात शब्द निघाल्याचे स्पष्टीकरण | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भाजपच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचा ठेकेदाराला जीवंत जाळण्याचा इशारा; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत वादळ!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका व माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी शहरातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेवरून तीव्र संताप व्यक्त करत ठेकेदाराला “जिवंत जाळून टाकीन” असा वादग्रस्त इशारा दिला आहे. या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले असून, विरोधकांबरोबरच सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनीही या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना निगडी आणि परिसरातील स्मशानभूमींच्या अस्वच्छता व अपुऱ्या सुविधांवर शैलजा मोरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्या म्हणाल्या, “निगडी येथील विद्युत दाहिनी आणि स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पाणी, वीज आणि कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. १० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना ठेकेदार केवळ २ कर्मचारी पुरवतो. स्मशानभूमीत सर्वत्र चिखल साचला आहे. या संदर्भात मी पाच महिन्यांपूर्वी महापौर आणि आयुक्तांना पत्र दिले होते, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही.”
आपला संताप व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या, “मला त्या ठेकेदाराचे नाव द्या, मी त्याला जिवंत जाळून टाकीन!” या वक्तव्यानंतर महासभेत एकच खळबळ उडाली.

या विधानाबाबत वृत्तपत्रांनी शैलजा मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचे पुत्र अनूप मोरे यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्या आईने शहरातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेबाबत नागरिकांचा राग व्यक्त केला. मात्र, भावनांच्या भरात बोलताना त्यांच्याकडून चुकीचे शब्द वापरले गेले,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

“शैलजा मोरे यांनी वापरलेली भाषा पूर्णपणे अयोग्य आहे. महापौर आणि मी स्वतः त्यांच्याशी याविषयी बोलू आणि महासभेत अशा शब्दांचा वापर न करण्याच्या सूचना देऊ.” – बापू काटे (शहर अध्यक्ष, भाजप

 

“सभागृहात अशा प्रकारे धमकीची किंवा असभ्य भाषा वापरणे अत्यंत चुकीचे आहे. महापौर व आयुक्तांनी अशा प्रकारांवर तत्काळ नियंत्रण आणायला हवे होते.” – सीमा सावळे (माजी स्थायी समिती अध्यक्षा)

 

“कोणालाही जिवंत जाळण्याची भाषा करणे हे अत्यंत संतापजनक व निषेधार्ह आहे. संबंधित नगरसेविकेने याबद्दल जाहीर खेद व्यक्त केला पाहिजे.” – योगेश बहल (शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

 

स्मशानभूमीतील समस्यांवरून सुरू झालेल्या या राजकीय नाट्यामुळे पालिका वर्तुळात लोकप्रतिनिधींच्या भाषेच्या मर्यादेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!