28
संगीत अकादमीतील सुविधांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा; विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / निगडी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अचानक भेट देऊन अकादमीतील विविध सुविधांची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी अकादमीच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला तसेच तेथे संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, प्रशासन अधिकारी दत्ता सूर्यवंशी, संगीत शिक्षक उमेश पुरोहित, समीर सूर्यवंशी, नंदीन सरीन, स्मिता देशमुख, संतोष साळवे, वैजयंती भालेराव, मिलिंद दलाल यांच्यासह विद्यार्थी आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी संगीत अकादमीमध्ये रियाजासाठी उपलब्ध असलेली वाद्ये व साधना, विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण तसेच प्रशासकीय कारभाराची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना संगीताचे धडे घेताना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा गैरसोय भासू नये, यासाठी उपलब्ध सुविधांचा स्तर उंचावण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या वेळी विद्यार्थ्यांनी उपमहापौरांसमोर अकादमीतील काही प्रमुख समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने लिफ्ट सुविधेतील तांत्रिक अडचणी, कार्यालयीन कामकाजासाठी लिपिकाची गरज, मनुष्यबळाची कमतरता आणि स्वच्छतेशी संबंधित प्रश्न उपमहापौरांच्या निदर्शनास आणून दिले. या समस्यांची गंभीर दखल घेत उपमहापौर बाबर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेजस्विनी धनंजय बोळे या गुणवंत विद्यार्थिनीचा या वेळी उपमहापौरांच्या हस्ते विशेष नागरी सत्कार करण्यात आला. तेजस्विनीने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ‘संगीत विशारद हार्मोनियम’ परीक्षेत प्रथम श्रेणीत घवघवीत यश संपादन केले आहे.
तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करून पुढील संगीत प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
