32
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU आगीची चौकशी करा; ‘महिला राजसत्ता आंदोलना’चे आरोग्यमंत्र्यांना अमरावती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU (नवजात शिशु निगा) कक्षात २४ ऑगस्ट २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत तीन निष्पाप नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या अत्यंत वेदनादायक घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करावे, या मागणीसाठी ‘महिला राजसत्ता आंदोलन’ जिल्हा अमरावती यांच्या वतीने महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU कक्षातील आगीच्या घटनेची तांत्रिक व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांचे ‘Fire & Electrical Safety Audit’ तातडीने पूर्ण करण्यात यावे. रुग्णालयांमधील NICU, ICU आणि प्रसूती विभागातील अग्निसुरक्षा यंत्रणा व विद्युत व्यवस्थेची विशेष तपासणी करण्यात यावी. सर्व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण व नियमित ‘मॉक ड्रिल’ सक्तीचे करण्यात यावे. भविष्यात अशा भीषण दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यस्तरावर विशेष ‘रुग्णालय सुरक्षा अभियान‘ राबवण्यात यावे.

“अमरावती स्त्री रुग्णालयातील निष्पाप तीन चिमुकल्यांचा मृत्यू ही संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी आणि अत्यंत वेदनादायक घटना आहे. सरकारी रुग्णालयांमधील निष्काळजीपणा आणि सुरक्षेचा अभाव यापुढे खपवून घेतला जाणार नाही. शासनाने याप्रकरणी तातडीने कडक पावले उचलावीत,” अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
या वेळी निवेदन देताना महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रतिभा खापरे, सुनीता राऊत, संजय खापरे, मनिष पाटील, प्रफुल्ल मंदा श्रीधर आणि सचिन सागर वासनिक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

