58
पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचखोरीचा बस्ट; सांगवी करसंकलन विभागात एसीबीची (ACB) धाड, लिपिक रंगेहात जाळ्यात!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / सांगवी: “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” या घोषणांचा विसर पडल्याचे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सिद्ध झाले आहे. शहरातील महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी बातम्या आणि कारवायांचा बडगा उगारूनही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महापालिकेच्या सांगवी येथील करसंकलन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने धडक कारवाई करत एका लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या करसंकलन (Tax Collection) विभागात लाचखोरीचा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एसीबीच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून सांगवी करसंकलन विभागातील लिपिक उमेश कुटे याला तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये पूर्वी रखवालदार पदावर कार्यरत असलेला उमेश कुटे हा थेट लिपिक पदापर्यंत कसा गेला, याच्या सेवाविषयक बाबींची आणि पदोन्नतीचीही सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे. या धाडसत्रामुळे भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कायदेशीर काम सुरू आहे.
महापालिकेच्या कार्यालयांमध्ये नागरिकांची साधी-साधी कामे अडवून ठेवून त्यांना नाहक चकरा मारण्यास लावले जाते आणि कामाच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली जाते, असा आरोप नागरिक सातत्याने करत आहेत. मुख्यालयापासून ते क्षेत्रीय कार्यालयांपर्यंत पसरलेल्या या भ्रष्टाचाराच्या जाळ्यामुळे सर्वसामान्य करदाते नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
“करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या महापालिकेत जर अशा प्रकारे सर्रास लाचखोरी चालत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावा? अशा दोषी कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची नावाला कारवाई न करता त्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्याची कडक भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे गैरकृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही.” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महापालिका प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कठोर दंडात्मक पावले उचलून लाचखोरांना अटकाव करण्यासाठी कडक संदेश देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
