55
पिंपरी-चिंचवड: खासगी शाळांच्या मुजोरीला चाप! नगरसेविका रिटा सचिन सानप यांच्या आक्रमक भूमिकेने पालकांना मोठा दिलासा; ‘एसओपी’मध्ये कडक तरतुदींची मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहरातील खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांवर लादली जाणारी भरमसाठ आणि अनियंत्रित शुल्काची टांगती तलवार आता हटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरणाविरोधात आणि सर्वसामान्य पालकांच्या हितासाठी नेहमीच आक्रमकपणे लढणाऱ्या महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सदस्या तथा नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी या गंभीर प्रश्नावर अत्यंत ठोस पाऊल उचलले आहे.
खासगी शाळांच्या मनमानी शुल्काला लगाम घालण्यासाठी महापालिकेकडून तयार करण्यात येत असलेल्या ‘स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (SOP) मध्ये अत्यंत कठोर व लोककल्याणकारी तरतुदी करण्याची जोरदार मागणी करत त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील पालकांना मोठा दिलासा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड हे कामगार, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे शहर आहे. अशा परिस्थितीत खासगी शाळांकडून दरवर्षी कोणतीही पूर्वकल्पना न देता केली जाणारी बेछूट शुल्कवाढ पालकांचे कंबरडे मोडत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी नगरसेविका रिटा सानप यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात खालील महत्त्वपूर्ण मागण्या रेटून धरल्या आहेत:
खासगी शाळांच्या अनियंत्रित शुल्कवाढीला अटकाव करण्यासाठी ‘SOP’ मध्ये स्पष्ट, पारदर्शक व कठोर नियम समाविष्ट करावेत. शिक्षणाचा हक्क प्रत्येक बालकाचा आहे. त्यामुळे पैशांअभावी कोणताही गरजू विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांसाठी किमान २० टक्के जागा सक्तीने राखीव ठेवल्याच पाहिजेत. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि भ्रष्टाचार किंवा वशिलेबाजीला पूर्णपणे फाटा मिळावा, यासाठी सर्व प्रवेश ‘लकी ड्रॉ’ (लॉटरी पद्धत) द्वारेच देण्याची पद्धत बंधनकारक करावी.
आमदार महेशदादा लांडगे यांच्या समर्थ व दूरगामी संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहराला एक आदर्श ‘शैक्षणिक हब’ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
केवळ शुल्क नियंत्रणच नव्हे, तर शाळकरी मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा विचार करून शाळांमध्ये ‘दप्तर विरहित दिवस’ (No Bag Day) प्रभावीपणे राबवण्याची मागणीही रिटा सानप यांनी केली आहे. यामध्ये कौशल्याधारित उपक्रमांचा समावेश असावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी बनवणे, हस्तकला आणि स्थानिक व्यवसायांची ओळख. कला, क्रीडा स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पुस्तक वाचन, कथाकथन आणि लोकसंस्कृतीचा परिचय. परिसर अभ्यास, क्षेत्रभेटी (Field Visits) आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रत्यक्ष धडे.
शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक दबावाला न जुमानता गोरगरिबांच्या मुलांना हक्काचे आणि गुणात्मक शिक्षण मिळवून देण्यासाठी नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी घेतलेल्या या कणखर आणि संवेदनशील पवित्र्याचे संपूर्ण शहरातून जोरदार स्वागत होत आहे. त्यांच्या या जनहितकारी उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवडच्या जनमानसात त्यांच्याबद्दल आदर आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून विश्वास अधिक दृढ झाला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
