57
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ ची धडक कारवाई; विद्युत डीपी चोरांची टोळी गजाआड, १६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / आळंदी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने धडक कारवाई करत ग्रामीण भागातून विद्युत डीपीमधील तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून ५ लाख १० हजार रुपयांच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली ३ वाहने असा एकूण १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद या ग्रामीण भागांतून विद्युत डीपी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट ३ कडून सुरू होता.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर व स्टाफला गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, डीपीमधील तारांची चोरी करणारे इसम भानोबाची कोयाळी (ता. खेड) परिसरात आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकून अक्षय बाबासाहेब काळे (वय ३४, रा. भानोबाची कोयाळी) आणि राहुल दिनकर पोकळे (वय २०, रा. पोकळेदरा, भानोबाची कोयाळी) या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी फरार आरोपी ललित मगर उर्फ नेपाळ्या याच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. तसेच चोरी केलेल्या तारा भानोबाची कोयाळी आणि मरकळ येथील भंगार विक्रेत्यांना विकल्याचे सांगण्यात आले.
चोरीचा माल खरेदी करणाऱ्या इजहार इस्माईल चौधरी (वय ४०, रा. भानोबाची कोयाळी, मूळ रा. उत्तर प्रदेश) आणि ब्रिजमोहन असर्फीलाल प्रजापती (वय ३०, रा. मरकळ, ता. खेड) या दोन भंगार विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या ५,१०,०००/- रुपये किमतीच्या तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आल्या. तसेच चोरीसाठी वापरलेली दोन दुचाकी व एक चारचाकी अशी ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
आरोपींच्या अटकेमुळे आळंदी पोलीस ठाण्यातील ४ आणि चाकण दक्षिण पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आले असून, १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. आळंदी पो.स्टे. २२६/२०२५ (भा.न्या.स. कलम ३०३(२), भारतीय विद्युत कायदा कलम १३६), आळंदी पो.स्टे. ५६३/२०२५ (भा.न्या.स. कलम ३०३(२), भारतीय विद्युत कायदा कलम १३६), आळंदी पो.स्टे. ११३/२०२५ (भा.न्या.स. कलम ३०३(२), भारतीय विद्युत कायदा कलम १३६), आळंदी पो.स्टे. ८६/२०२६ (भा.न्या.स. कलम ३०३(२), भारतीय विद्युत कायदा कलम १३६), चाकण दक्षिण पो.स्टे. ७९/२०२६ (भारतीय विद्युत कायदा कलम १३६), चाकण दक्षिण पो.स्टे. १३/२०२६ (भारतीय विद्युत कायदा कलम १३६), चाकण दक्षिण पो.स्टे. १८/२०२६ (भारतीय विद्युत कायदा कलम १३६)
सदर धडक कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, ऋषिकेश भोसुरे, युवराज बिराजदार, सागर सूर्यवंशी, सचिन गोनटे, बाळासाहेब खेडकर, स्वप्निल महाले, अजित रूपनवर, निखिल फपाळे, नितीन गुंजाळ, शशिकांत नांगरे आणि बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
