131
‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद २०२६’ च्या अधिकृत संकेतस्थळाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते लोकार्पण!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद- पुणे २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची सविस्तर माहिती देणाऱ्या www.thewisdominmotion.org या अधिकृत संकेतस्थळाचे (Website) लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजन समितीच्या डॉ. उज्ज्वला आंदुरकर (प्रसिद्ध भूलतज्ज्ञ), डॉ. संध्या हरिभक्त (बालरोगतज्ज्ञ), डॉ. वैशाली भामरे तसेच लक्ष्मीकांता माने (पाली व बौद्ध अध्ययनाच्या अभ्यासक) यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
बौद्ध धम्माचा आणि भगवान बुद्धांच्या विचारांचा जागतिक स्तरावर व्यापक प्रचार-प्रसार करणे तसेच जगभरातील बौद्ध अभ्यासक, भिक्खू, संशोधक व अनुयायांना एकत्र आणणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेत व्हिएतनाम, श्रीलंका, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील नामांकित भिक्खुणी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक, कलाकार आणि धम्म-साधक वक्ते व panelist म्हणून सहभागी होणार आहेत. या नव्याने सुरू केलेल्या संकेतस्थळावर परिषदेचा उद्देश, सहभागी वक्ते, नोंदणी प्रक्रिया (Registration) आणि ऑनलाइन धम्मदान देण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी, संशोधक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी आणि धम्माच्या जिज्ञासूंसाठी ही परिषद शिकण्याची आणि प्रेरणा घेण्याची मोठी संधी ठरणार आहे.
परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या देश-विदेशातील नागरिकांनी अधिक माहितीसाठी ७८८८१२९१६९ आणि ८९७५७३८६३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
