news
Home अमरावती ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत समाज कल्याण विभागाकडून विकास तातड यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित!

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत समाज कल्याण विभागाकडून विकास तातड यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित!

अमेरिकेत महापौर पुरस्काराने गौरव; आयुक्त दीपा मुंडे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे केले कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चहाच्या टपरीपासून कोलंबिया विद्यापीठापर्यंत: विकास तातड यांचा प्रेरणादायी प्रवास!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: जिद्द, चिकाटी आणि शासकीय योजनांच्या योग्य पाठबळाच्या जोरावर आर्थिक परिस्थितीवर मात करत यश कसे संपादन करता येते, याचे ज्वलंत उदाहरण अमरावतीच्या विकास तातड यांनी घालून दिले आहे. वडिलांच्या चहाच्या टपरीवर मदत करण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अमेरिकेतील नामांकित कोलंबिया विद्यापीठापर्यंत पोहोचला आहे. समाज कल्याण विभागाच्या ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती’ योजनेमुळे घडलेला हा प्रवास आज अमरावतीतील युवा पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
राज्य शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केवळ कॉलनी येथील विकास तातड यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली व दिवा प्रज्वलित केला.

आपल्या संघर्षमय प्रवासाची माहिती देताना विकास तातड यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांची छोटीशी चहाची टपरी होती. वडिलांना कामात हातभार लावत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आस सोडली नाही आणि मुंबईतील प्रतिष्ठित ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ (TISS) येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवला.
 २०१८ मध्ये त्यांचा शोधनिबंध अमेरिकेतील मँचेस्टर विद्यापीठात निवडला गेला. तिथे सादरीकरणादरम्यान त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला भेट दिली आणि तिथेच उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार केला.  २०२२ मध्ये त्यांची कोलंबिया विद्यापीठातील ‘इंटरनॅशनल अँड कंपॅरेटिव्ह एज्युकेशन‘ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती (२०२२-२३) च्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेत हे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी काम केले. या कार्याची दखल घेऊन न्यू जर्सीच्या महापौरांनी त्यांचा विशेष सत्कार केला होता.

 

परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतरही विकास तातड यांनी अमरावतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सध्या ते ‘क्षमता बांधणी’ क्षेत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अमरावतीतील सिद्धार्थ नगर येथे ‘स्लम स्कूल’ ची स्थापना केली असून, त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या वंचित व गरीब विद्यार्थ्यांना अल्प खर्चात दर्जेदार शिक्षण देण्याचे काम ते करत आहेत.
समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दीपा (मुधोळ) मुंडे यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे विकास तातड यांच्याशी संवाद साधून त्यांच्या संघर्षाचे आणि यशाचे कौतुक केले. भविष्यात कोलंबिया विद्यापीठातूनच पीएचडी (Ph.D.) पूर्ण करण्याची आपली इच्छा असल्याचे विकास यांनी यावेळी व्यक्त केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!