news
Home पिंपरी चिंचवड ‘झाडे लावा, झाडे जगवा’च्या नाऱ्याची उडली ऐशीतैशी; निगडीत १५ वर्षे जुन्या डेरेदार वृक्षाची मेट्रो ठेकेदाराकडून कत्तल!

‘झाडे लावा, झाडे जगवा’च्या नाऱ्याची उडली ऐशीतैशी; निगडीत १५ वर्षे जुन्या डेरेदार वृक्षाची मेट्रो ठेकेदाराकडून कत्तल!

भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर आक्रमक; बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मेट्रो कामाच्या नावाखाली सर्रास वृक्षतोड; ठेकेदारावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करा, भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांची ठाम मागणी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरण रक्षण आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच अग्रभागावर राहून आवाज उठवणारे भारतीय जनता पार्टीचे अभ्यासू कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आता मेट्रो प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामाच्या नावाखाली जुन्या आणि डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, या बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी जबाबदार मेट्रो ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सचिन काळभोर यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-पुणे महामार्गावरील इन्स्पिरिया मॉलसमोर असलेले सुमारे १० ते १५ वर्षे जुने डेरेदार झाड मेट्रोच्या ठेकेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय तोडून टाकले आहे.
केवळ एकाच ठिकाणी नव्हे, तर निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गावर इतर अनेक ठिकाणी देखील मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या नावाखाली अनधिकृतपणे वृक्षतोड सुरू आहे. यामुळे शहरातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

एकीकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन शहरातील नागरिकांना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत हरित शहराचा नारा देते, तर दुसरीकडे मेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदारांकडून उघड्याडोळ्यांसमोर वृक्षतोड सुरू असताना प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे, असा सवाल सचिन काळभोर यांनी उपस्थित केला.
सचिन काळभोर यांच्या प्रमुख मागण्या  इन्स्पिरिया मॉलसमोरील १५ वर्षे जुने झाड तोडणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ठेकेदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.  मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर झालेल्या व सुरू असलेल्या वृक्षतोडीची महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करावी.  वृक्षतोडीस पाठिंबा देणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित मेट्रो अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

 

नेहमीच सामाजिक भान जपत जनतेच्या आणि पर्यावरणाच्या हितासाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या सचिन काळभोर यांच्या या धडक भूमिकेमुळे पर्यावरणप्रेमींमधून त्यांचे विशेष कौतुक होत असून, पालिका प्रशासन आता या ठेकेदारावर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!