31
‘मिच्छामी दुक्कडम्’; अमरावतीत दिगंबर जैन समाजाच्या वतीने क्षमायाचना करत भव्य मिरवणूक संपन्न!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: जैन समाजाचा अत्यंत महत्त्वाचा व पवित्र सण असलेल्या ‘पर्युषण महापर्व’ आणि ‘क्षमावाणी पर्वा’चे औचित्य साधून अमरावतीतील सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणुकीचे (शोभायात्रा) आयोजन करण्यात आले. तप, साधना आणि आत्मकल्याणाच्या या पर्वात पूज्य मुनिश्री १०८ निराकारसागर महाराज, मुनिश्री १०८ निर्माणसागर महाराज आणि मुनिश्री १०८ उत्साहसागर महाराज यांच्या पावन सानिध्यात ही भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अमरावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरातील साती दिगंबर जैन मंदिरांच्या भाविकांनी एकत्र येत क्षमावाणी पर्व साजरे केले. या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व त्रिवेणी संगमाने संपूर्ण अंबानगरी धर्मनगरीमय झाल्याचे पाहायला मिळाले.
सकाळी ७ वाजता श्री आदिनाथ दिगंबर जैन परवार मंदिरात श्रीजींचा अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीजींना आकर्षक पालखीत विराजमान करून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. ही मिरवणूक सराफा बाजार, भांडे बाजार, जवाहर गेट, तहसील रोड, राजकमल चौक, गांधी चौक, बुधवारा आणि दहीसाथ या मुख्य मार्गांवरून जात षटखंडागम भवन येथे पोहोचली.
शोभायात्रेत श्रावक (पुरुष) श्वेतवस्त्रांमध्ये तर श्राविका (महिला) लाल रंगाच्या बांधणी साड्या परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पूज्य मुनि महाराज स्वतः संपूर्ण मिरवणुकीत भाविकांसोबत पायी चालत होते, जो सर्व भाविकांसाठी अत्यंत भाग्याचा आणि अलभ्य योग ठरला. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी जैन समाजबांधवांकडून मुनि महाराज आणि भगवान महावीरांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करून औक्षण करण्यात आले. भाविकांनी एकमेकांकडे ‘मिच्छामी दुक्कडम्’ म्हणत कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमायाचना केली.

षटखंडागम भवन येथे पोहोचल्यानंतर श्रीजींचा अभिषेक, शांतीधारा आणि आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांचे पूजन करण्यात आले. पर्युषण पर्वात सलग १० दिवस निर्जल उपवास, ७ दिवस उपवास आणि ५ दिवस कठोर तपश्चर्या करणाऱ्या तपस्वी श्रावक-श्राविकांचा दिगंबर जैन मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
यानंतर तिन्ही मुनिराजांचे क्षमावाणी पर्वावर अमृतमय प्रवचन पार पडले. वर्ष २०२१ नंतर तब्बल २०२६ मध्ये अमरावतीत गुरुकृपेने चातुर्मासाचा मंगल संयोग प्राप्त झाला असून, या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
अमरावती शहरात दिगंबर जैन समाजाची एकूण ७ मंदिरे असून दरवर्षी प्रत्येक मंदिरात स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, यावर्षी सर्व ७ मंदिरांच्या ट्रस्टींनी व भाविकांनी एकत्र येत संयुक्तपणे हा सोहळा साजरा केला. पूज्य महाराजांचे सानिध्य, भगवंताची नगरपरिक्रमा आणि साती मंदिरांची अभूतपूर्व एकता यामुळे यावर्षीचे क्षमावाणी पर्व अमरावतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

