news
Home पिंपरी चिंचवड ‘डीपी’ चोरट्यांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा दणका; चाकणमधील ४ गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश!

‘डीपी’ चोरट्यांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा दणका; चाकणमधील ४ गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश!

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून उत्तर प्रदेशच्या ३ चोरट्यांना बेड्या; अर्टिगा कारही पोलिसांच्या ताब्यात | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शेतकऱ्यांचे ‘डीपी’ फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची १० लाखांच्या मुद्देमालासह मोठी कारवाई!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ग्रामीण भागामध्ये शेतीपंपासाठी उभारलेल्या महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रीक ‘डीपी’ (रोहित्र) मधून तांब्याच्या तारांची चोरी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून २४२ किलो तांब्याच्या तारा आणि एक अर्टिगा कार असा १० लाख ४२ हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चाकण परिसरातील ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शेतीपंपाच्या डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला होता.
दरम्यान, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे आणि पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते आणि पथकाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी देहूरोड फूड प्लाझा येथे सापळा रचला. तेथे पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारमधून आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी मोहम्मद तय्यब मोहम्मद शफी शहा (वय २८, रा. कुदळवाडी, चिखली, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), मैनुद्दीन खलील शहा (वय ३५, रा. कुदळवाडी, चिखली, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), सुफियान जमीरउल्ला खान (वय १९, रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश)

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता खालील ४ गुन्हे उघडकीस आले असून, चोरीस गेलेला १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दक्षिण चाकण पोलीस ठाणे गु.र.क्र. ०४/२०२६ (भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १३६ व BNS कलम ३२४(४)), उत्तर चाकण पोलीस ठाणे: गु.र.क्र. २६५/२०२६ (भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १३६), उत्तर चाकण पोलीस ठाणे: गु.र.क्र. ३१०/२०२६ (भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १३६), उत्तर चाकण पोलीस ठाणे: गु.र.क्र. ४८८/२०२६ (भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १३६)

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ गोरे, नितीन उमरजकर, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, गणेश कोकणे, पवन बाजे, विनोद वीर, हर्षद कदम, समीर रासकर, अमर कदम, मोहसीन अत्तार, अमोल गोरे, अशोक मरळ, गणेश सावंत व ज्ञानेश्वर कोळगे यांच्या पथकाने केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!