news
Home पिंपरी चिंचवड ‘तुम्ही दाराच्या लायकीचे आहात’; वायसीएम रुग्णालयाच्या लिफ्टसमोरील घटनेप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांची मोठी कारवाई!

‘तुम्ही दाराच्या लायकीचे आहात’; वायसीएम रुग्णालयाच्या लिफ्टसमोरील घटनेप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांची मोठी कारवाई!

कौशल्याने सेवा देणाऱ्या डॉक्टराचा द्वेषातून मानसिक छळ; फरार डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वायसीएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; जातिवाचक शिवीगाळ व मानसिक छळावरून अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात प्रशासकीय दडपशाही आणि मागासवर्गीय वैद्यकीय अधिकाऱ्याचा जातिवाचक अपमान केल्याचा अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean) डॉ. राजेंद्र नामदेव वाबळे यांनी कौशल्याने आणि निष्ठेने सेवा बजावणाऱ्या हृदयरोगतज्ज्ञाचा मानसिक छळ करत सर्वांसमक्ष जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम (ॲट्रॉसिटी) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी डॉ. राजेंद्र वाबळे हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे महापालिका आणि वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार डॉ. ज्ञानेश्वर विश्वनाथ बोराडे हे वायसीएम रुग्णालयात हृदयरोग उपचाराबाबत उत्तम सेवा देत आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातील असलेले डॉ. बोराडे यांच्या उपचारांमुळे रुग्णालयात रुग्णांची संख्या आणि त्यांची सामाजिक लोकप्रियता झपाट्याने वाढली होती. याच व्यावसायिक यशाचा आणि लोकप्रियतेचा द्वेष मनात धरून डॉ. राजेंद्र वाबळे यांनी आपल्या आर्थिक व प्रशासकीय हितसंबंधांना धोका निर्माण होईल या भीतीपोटी डॉ. बोराडे यांच्याविरोधात जाणीवपूर्वक कट-कारस्थान रचले.
डॉ. बोराडे यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी वारंवार चुकीचे अहवाल तयार करणे, प्रशासकीय अडथळे निर्माण करणे आणि त्यांना प्रचंड मानसिक तणावाखाली ठेवण्याचे काम डॉ. वाबळे यांच्याकडून केले जात होते.

ही गंभीर घटना दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता वायसीएम रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर लिफ्टसमोरील पॅसेजमध्ये घडली. डॉ. ज्ञानेश्वर बोराडे हे आपले अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले असता, तिथे त्यांचे नातेवाईक व इतर नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सर्वांसमक्ष डॉ. बोराडे यांना, “महापालिकेच्या सामान्य सभेमध्ये तुला सेवेतून कमी केलेले आहे, तू दाराच्या लायकीचा आहेस आणि तू हॉस्पिटलमध्ये डोरा सारखा फिरतोस का?” असे अत्यंत अपमानास्पद, तुच्छतादर्शक आणि जातिवाचक उद्गार काढून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले. या जाहीर मानहानीमुळे डॉ. बोराडे तीव्र मानसिक तणावाखाली आले आणि त्यांनी अन्यायाविरुद्ध तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

डॉ. ज्ञानेश्वर बोराडे यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात आरोपी डॉ. राजेंद्र नामदेव वाबळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३५२, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r), ३(१)(s) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा सखोल तपास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत. महापालिकेच्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थेतच डॉक्टरनेच दुसऱ्या डॉक्टरवर अशा प्रकारे जातिवाचक अन्याय केल्यामुळे या प्रकरणातील फरार आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!