राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी देवेंद्र तायडे यांची नियुक्ती!
पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले दि. २९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्षपदी देवेंद्र तायडे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या मान्यतेने, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्या सूचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र तायडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या हस्ते तायडे यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार तथा सर्व फ्रंटलचे समन्वयक रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच देवेंद्र तायडे यांना ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व पिंपरी-चिंचवडचे पक्ष निरीक्षक सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत ही सविस्तर माहिती दिली.
देवेंद्र तायडे यांच्या निवडीमागील संघटनात्मक पार्श्वभूमी आणि पक्षाचा विश्वास व्यक्त करताना सुनील माने म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले देवेंद्र तायडे हे शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील एक नामांकित आणि अभ्यासू चेहरा आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष म्हणून तब्बल १० वर्षे धुरा सांभाळली आहे. तसेच गेल्या ३ वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहेत. तायडे हे स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineer) पदवीधर असून, जनसामान्यांपासून ते औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांपर्यंत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ते आमदारकीसाठी इच्छुक होते. मात्र, आदरणीय शरद पवार साहेब, आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांनी स्वतःहून आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यांच्या याच निष्ठेची दखल घेत पक्षाने त्यांना शहराध्यक्षपदाचा बहुमान दिला आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून पक्ष संघटना वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र तायडे यांच्यासारख्या अनुभवी आणि आक्रमक नेतृत्वामुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात पक्ष संघटनेला नवी दिशा मिळेल. आगामी काळात शहरातील विविध नागरी समस्यांवर प्रभावीपणे काम करून कार्यकर्त्यांची नवी फळी उभारली जाईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
