59
आजच्या काळात महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसेच्या विचारांची गरज: सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांचे प्रतिपादन
औंध, पुणे प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
औंध: आज समाजात वाढत असलेला तणाव, हिंसाचार आणि असहिष्णुता पाहता महात्मा गांधींच्या सत्य व अहिंसेच्या विचारांचे महत्त्व अधिक वाढले आहे. सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि स्वच्छता या मूल्यांचा अंगीकार केल्यास समाज अधिक शांततामय व सुसंवादी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘स्वच्छता अभियानांतर्गत’ विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एकत्र येत महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रबंजन चव्हाण, उपप्राचार्य डॉ. संदीप ननावरे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. कुशल पाखले, हिंदी विभागप्रमुख डॉ. स्वाती चव्हाण, डॉ. सचिन बोटकुळे, डॉ. तेजस्विनी नेबापूर यांच्यासह बी.ए., बी.कॉम. व बी.सी.ए. शाखेचे सुमारे ३० ते ४० विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाविषयी सविस्तर माहिती देताना सुनील पोकरे म्हणाले की, “१९३० मध्ये गांधीजींनी साबरमती आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रा केली होती. देश स्वतंत्र होईपर्यंत साबरमती आश्रमात परतणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यानंतर जमनालाल बजाज यांच्या आग्रहावरून गांधीजी १९३४ मध्ये वर्धा येथे आले आणि १९३६ मध्ये वर्ध्याजवळील तत्कालीन शेगाव येथे वास्तव्यास आले. पुढे या ठिकाणाचे ‘सेवाग्राम’ असे नामकरण झाले.”
सेवाग्राम आश्रमातील गांधीजींचे साधे जीवन, त्यांनी वापरलेल्या वस्तू तसेच सामुदायिक प्रार्थना, स्वच्छता, सूतकताई आणि श्रमाला दिलेले महत्त्व यामुळे सेवाग्राम आश्रम गांधी विचारांचे मोठे प्रेरणास्थान बनल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार डॉ. कुशल पाखले यांनी मानले. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना अल्पोपहार व चहाचे वाटप करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

