35
रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या; दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाळुंगे: निघोजे-तळवडे ब्रिज रोडवर एका रिक्षा प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अमन उर्फ शाहबाज समीर शेख (वय २६ वर्ष) आणि शेखर बापू माने (वय २१ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार अजय चिंतामन देसलेपाटील (वय २९ वर्ष) हे दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत एमएआरजे टेक्ने प्लास्ट कंपनीसमोर निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरून प्रवास करत होते. त्यावेळी एका अनोळखी रिक्षा चालकाने आणि त्याच्या दोन साथीदारांनी देसलेपाटील यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवला. जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील ११,४७०/- रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.
याप्रकरणी तक्रारदाराच्या जबाबावरून दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.र.क्र. ७८७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) आणि आर्म ॲक्ट ४(२५)) दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तात्काळ तपास पथके तयार करण्यात आली. घटनेचा कोणताही थेट सुगावा नसताना तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्हीचे अत्यंत बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले. त्याद्वारे गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा क्रमांक प्राप्त करण्यात पोलिसांना यश आले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २४ तासांच्या आत अमन उर्फ शाहबाज समीर शेख आणि शेखर बापू माने यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली, तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.
अमन उर्फ शाहबाज समीर शेख हा आरोपी निगडी पोलीस ठाण्यातील मोक्का (MCOCA) अंतर्गत दाखल गुन्ह्यातून अवघ्या १५ दिवसांपूर्वीच जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शेखर बापू माने या आरोपीवरही जबरी चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-४) श्रीमती श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवड, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये, पोलीस हवालदार चेतन सावंत, पोलीस शिपाई राजेंद्र खेडकर, प्रवीण बांबळे, शिवाजी मरकड, राजेश गिरी, आकाश घाडगे आणि राजकुमार हणमंते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
