news
Home पिंपरी चिंचवड ‘मायबोली मराठीचा भव्य जागर’; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चे आयोजन!

‘मायबोली मराठीचा भव्य जागर’; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चे आयोजन!

नाटके, कवी संमेलन, लावणी अन् संगीतमय कार्यक्रम रंगणार; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात साजरा होणार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ०१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: अभिजात मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठीचे संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
या महाउत्सवाचे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार असून, याप्रसंगी सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन विशेष सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

हा सप्ताह नागरिकांसाठी विनामूल्य असून शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड), आचार्य अत्रे रंगमंदिर (पिंपरी), नटसम्राट निळू फुले नाट्यगृह (सांगवी), चिखली टाऊनहॉल (चिखली) आणि ग. दि. माडगूळकर सभागृह (आकुर्डी) या पाच प्रमुख ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह- चिंचवड – ३ ऑक्टोबर सकाळी १० वा. पारंपरिक वाद्यांच्या निनादात उद्घाटन; ‘अंतर्नाद’ नाट्य-संगीतमय आविष्कार. दुपारी ३ वा. पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सन्मान व सायंकाळी ४ वा. ‘गाणी मंगेशकरांची’ कार्यक्रम. रात्री ९ वा. अशोक हांडे प्रस्तुत ‘मंगलगाणी दंगलगाणी’. ४ ऑक्टोबर ‘भिरभिर’ व ‘इन दि नेम ऑफ’ एकांकिका; दुपारी १२:३० वा. संकर्षण कऱ्हाडे अभिनीत ‘नियम व अटी लागू’ नाटक; सायंकाळी ‘धरित्रीच्या लेकी’ आणि रात्री ‘द फोक महाराष्ट्र’. ५ ऑक्टोबर दुपारी १२ वा. सागर कारंडे लिखित-अभिनीत ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’; सायंकाळी ५:३० वा. सचिन खेडेकर अभिनीत ‘भूमिका’ हे नाटक. ६ ऑक्टोबर ‘ऑल दि बेस्ट’ आणि विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘वरवरचे वधूवर’ ही नाटके. ७ ऑक्टोबर दुपारी १२:३० वा. ‘फोक लावणी’ (केवळ महिलांसाठी); सायंकाळी ५:३० वा. भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’. ८ ऑक्टोबर ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ हे बालनाट्य; ‘गझल आख्यान’ आणि कवी वैभव जोशी यांचा ‘द मनमौजी’. ९ ऑक्टोबर बक्षीस वितरण व समारोप; निमंत्रितांचे कवी संमेलन आणि रात्री ९ वा. ‘अविनाश – विश्वजित संगीत रजनी’.
आचार्य अत्रे रंगमंदिर-  पिंपरी – ५ ऑक्टोबर अभिवाचन, परिसंवाद, कथाकथन व गझल मुशायरा. ६ ऑक्टोबर बालगीते, बालनाट्य आणि ‘कवन – अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही कवितांची मैफिल. ७ ऑक्टोबर स्थानिक कवी संमेलन, चर्चासत्र आणि शाहिर प्रकाश ढवळे यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम.
नटसम्राट निळू फुले नाट्यगृह– सांगवी- ५ ते ९ ऑक्टोबर ‘अभंग व लोकगीते’, अभिजित कोसंबी व कविता राम यांचा ‘सदाबहार अजय – अतुल’ सांगीतिक कार्यक्रम; महिलांसाठी विशेष ‘लावण्यरंग’ (७ ऑक्टोबर); स्वप्नील जोशी अभिनीत ‘लग्नपंचमी’ (७ ऑक्टोबर रात्री ८ वा.) आणि संजय नार्वेकर प्रस्तुत ‘भ्रमाचा भोपळा’ (९ ऑक्टोबर).
चिखली टाऊनहॉल व ग. दि. माडगूळकर नाट्यगृह– आकुर्डी – चिखली येथे बालनाट्य व ‘अभंगवारी’ कार्यक्रम, तर आकुर्डी येथे महापालिका शाळांची समूह नृत्य स्पर्धा आणि ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. नंदेश विठ्ठल उमप यांचा ‘मी मराठी’ हा लोककला सोहळा रंगणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कला दालनात माध्यम प्रतिनिधींनी टिपलेल्या निवडक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन (सकाळी ९ ते सायंकाळी ६) आयोजित करण्यात आले आहे.

“मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळणे हा महाराष्ट्राच्या समृद्ध भाषिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे. हा गौरव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेने या सप्ताहाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
“नागरी सहभागातून मायबोली मराठीचा प्रचार व प्रसार अधिक दृढ होईल. नागरिकांनी या उपक्रमांत सक्रिय योगदान द्यावे.”
— विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!