news
Home पिंपरी चिंचवड ‘बालेवाडीतील खडतर सराव अन् शालेय क्रीडा संस्कृती’; सक्षम जाधवचे तलवारबाजी स्पर्धेत दैदिप्यमान यश!

‘बालेवाडीतील खडतर सराव अन् शालेय क्रीडा संस्कृती’; सक्षम जाधवचे तलवारबाजी स्पर्धेत दैदिप्यमान यश!

छत्रपती पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक श्वेता चंडालिया व क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी यांचे लाभले मार्गदर्शन; प्राचार्य डॉ. बिंदू सैनी यांच्याकडून अभिनंदन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधवची तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

रावेत: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये रावेत येथील ‘एस. बी. पाटील पब्लिक स्कूल’च्या सक्षम जाधव याने १४ वर्षांखालील वयोगटात अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या सक्षमने स्पर्धेतील एकूण ६ फेऱ्यांमध्ये प्रत्येकी ५ गुणांचे लक्ष्य साध्य करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि सर्व फेऱ्यांमध्ये विजय मिळवला. कासारवाडी प्राथमिक शाळा येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत २४ शाळांमधील सुमारे ५६ वैयक्तिक खेळाडू आणि १८ संघांनी विविध गटांत सहभाग नोंदवला होता.

सक्षम जाधव याला एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच तो इयत्ता तिसरीपासून बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात छत्रपती पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक श्वेता चंडालिया यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजीचे नियमित प्रशिक्षण घेत आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवण्यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याच उत्तम क्रीडा संस्कृतीमुळे सक्षम जाधव याने हे उत्तुंग यश संपादन केल्याचे प्रतिपादन विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बिंदू सैनी यांनी केले.

सक्षमच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका पद्मावती बंडा आणि क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी यांनी सक्षमचे विशेष अभिनंदन करून पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!