news
Home अमरावती ‘कथाकथनातून उलगडले ग्रामीण जीवन अन् हास्याची कारंजी’; डॉ. सतीश तराळ यांच्या सादरीकरणाने रंगली साहित्यिक मैफील!

‘कथाकथनातून उलगडले ग्रामीण जीवन अन् हास्याची कारंजी’; डॉ. सतीश तराळ यांच्या सादरीकरणाने रंगली साहित्यिक मैफील!

मराठी विभागप्रमुख डॉ. जनार्दन काटकर यांचे अध्यक्षीय मनोगत; संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत डॉ. सतीश तराळ यांचे रंगले कथाकथन व प्रशिक्षण!

अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ०२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: येथील शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान स्वायत्त संस्थेतील मराठी पदव्युत्तर संशोधन मंडळ आणि मराठी वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध कथाकार डॉ. सतीश तराळ यांच्या कथाकथन व कथाकथन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. जनार्दन काटकर होते.

आपल्या मार्गदर्शनाची सुरुवात करताना डॉ. सतीश तराळ यांनी महात्मा फुले द्विशताब्दी जन्मवर्ष व गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अलौकिक कार्याला अभिवादन केले. “महात्मा गांधी हे विश्वातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व मानले जातात, तर महात्मा फुले हे महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकशाही जनक्रांतीचे अग्रदूत होते. ते महान व्हाल्टेअर आणि क्रुसेडर होते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कथा कशी कथन करावी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करताना डॉ. तराळ यांनी कथाकथनाच्या क्षेत्रातील आपल्या अनेक आठवणी व गमतीजमती सांगितल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संशोधक विद्यार्थिनी सुहानी ओगले यांनी ‘मधुरा’ आणि मनाली तायडे यांनी ‘कुस्करलेली कळी’ या आपल्या स्वलिखित कथांचे सादरीकरण केले.  डॉ. तराळ यांनी बालभारतीच्या पुस्तकातील आपली ‘गंगा मिळाली यमुनेला‘ ही बालकथा सादर केली. मानवातील पशुत्व आणि पशूमधील मनुष्यत्वाचे दर्शन घडवणारी ही कथा रसिकांच्या मनाला स्पर्शून गेली. त्यानंतर सादर केलेल्या ‘मोजणी’ या ग्रामीण कथेतून शेतकऱ्यांच्या यातना आणि ग्रामीण माणसांच्या स्वभावाचे विविध पैलू त्यांनी हुबेहूब उलगडून दाखवले. कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेल्या दोन विनोदी कथांनी सभागृहात हास्याची कारंजी फुलवली. त्यांच्या बहारदार सादरीकरणामुळे विद्यार्थी व प्राध्यापक मंत्रमुग्ध झाले.

 

अध्यक्षीय भाषणात डॉ. जनार्दन काटकर यांनी मराठी विभागात पार पडलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन भविष्यातील साहित्यिक कार्यक्रमांची माहिती दिली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची साहित्यिक अभिरुची वाढून त्यांना साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे संचालक प्रा. डॉ. केशव तुपे यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राहुल फाटकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पूजा बुल यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. स्मिता माळोदे यांनी केले तर आभार प्रा. तृप्ती बेलसरे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशासाठी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय लोहकरे, प्रा. दिनेश डुडूल, प्रा. विद्या शेंडे, प्रा. दीपिका शिरसाट, तसेच संशोधक विद्यार्थिनी गीता गावंडे, आचल येवले, भारती आंबाडकर, कुणाल कांबळे, निखिल मरस्कोल्हे, ऋत्विक तायडे, आदिनाथ धनवे, हर्षल देशमुख, अनिकेत मेश्राम, विक्की पोहनकर, साक्षी रोटे, दिव्यानी राऊत आणि तृप्ती वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी एम.ए. भाग १ व २ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!