news
Home अमरावती अमरावतीत विद्यार्थ्यांसाठी ‘पॉलिटिक्स अन् मीडिया’ विषयावर प्रात्यक्षिक वर्ग; राजकीय मजकुराचे विश्लेषण शिकवले!

अमरावतीत विद्यार्थ्यांसाठी ‘पॉलिटिक्स अन् मीडिया’ विषयावर प्रात्यक्षिक वर्ग; राजकीय मजकुराचे विश्लेषण शिकवले!

संचालक डॉ. केशव तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागाचा उपक्रम; विभागप्रमुख डॉ. प्रतिभा भोरजार यांचे अध्यक्षीय मनोगत | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राजकारण आणि माध्यमे समजून घेताना प्रत्यक्ष बातमी निर्मितीचे धडे; शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत ‘पॉलिटिक्स आणि मीडिया’वर कार्यशाळा!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ३० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: राजकारण आणि माध्यमे यांचा समाजजीवनाशी असलेला संबंध समजून घेताना केवळ पुस्तकी किंवा सैद्धांतिक माहिती पुरेशी नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माध्यम प्रक्रियेचा अनुभव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीच्या राज्यशास्त्र विभागात ‘पॉलिटिक्स आणि मीडिया — राजकारण व माध्यमे’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे संचालक डॉ. केशव तुपे, IQAC समन्वयक डॉ. मंगेश शेळके आणि शैक्षणिक समन्वयक डॉ. दुर्गेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा भोरजार होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ व्याख्यान न देता प्रत्यक्ष बातमी निर्मितीचा सराव करून घेण्यात आला.  सामाजिक किंवा राजकीय विषयाची निवड करणे, महत्त्वाची माहिती शोधणे, संबंधित व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेणे, तथ्य व मतात फरक करणे, आकर्षक मथळा व उपमथळा तयार करणे आणि वृत्तलेखन करणे अशा विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती केली. एखाद्या सामाजिक विषयाकडे राजकारण, समाज आणि माध्यमे कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतात, यावर सखोल चर्चा करून प्रात्यक्षिके घेण्यात आली. डिजिटल व सोशल मीडियाच्या काळात माहितीची सत्यता तपासणे, स्रोत समजून घेणे आणि जबाबदार नागरिक म्हणून माहिती प्रसारित करणे किती महत्त्वाचे आहे, यावर विशेष भर देण्यात आला.

हा विषय केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता भविष्यात बातमी लेखन, मुलाखती घेणे, सामाजिक विषयांचे वृत्तांकन, राजकीय मजकुराचे विश्लेषण आणि डिजिटल माहितीची पडताळणी अशा विविध प्रात्यक्षिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल, असे राज्यशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.

या कार्यशाळेला राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. के. एच. वासनिक, डॉ. सुनील इंगळे, डॉ. प्रमोद तालन, डॉ. सुमित वाघमारे, कु. अनामिका मेश्राम आणि क्रांती मीडिया प्रतिनिधी सचिन वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. पवन तायडे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!