29
पंचायतराज व्यवस्था आणि ७३ व्या घटनादुरुस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे : प्रतिभा खापरे
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाही व्यवस्थेचा मुख्य पाया असून, पंचायतराज व्यवस्था आणि ७३ व्या घटनादुरुस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सखोलपणे समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभा संजय खापरे यांनी केले.
शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था, अमरावती येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने २६ सप्टेंबर २०२६ रोजी ‘पंचायतीचा इतिहास, ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर झालेले महत्त्वाचे बदल, विविध समित्या व त्यांची कार्ये’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा भोरजार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

व्याख्यानादरम्यान प्रतिभा खापरे यांनी पंचायतराज व्यवस्थेचा ऐतिहासिक विकास, राज्यघटनेतील ७३ वी घटनादुरुस्ती आणि स्थानिक प्रशासनाला मिळालेले घटनात्मक स्थान यावर विस्तृत प्रकाश टाकला. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची रचना, कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या त्यांनी स्पष्ट केल्या. ग्राम समित्यांची कार्ये सांगताना लोकसहभाग आणि निर्णयप्रक्रियेत महिलांच्या प्रभावी भूमिकेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे महिलांना राजकीय सहभागाची मोठी संधी मिळाली असून विद्यार्थ्यांनी संविधान व स्थानिक प्रशासनाची सखोल माहिती आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सदर उपक्रम संस्थेचे संचालक डॉ. केशव तुपे, IQAC समन्वयक डॉ. मंगेश शेळके आणि शैक्षणिक समन्वयक डॉ. दुर्गेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. के. एच. वासनिक, डॉ. सुनील इंगळे, डॉ. प्रमोद तालन, डॉ. सुमित वाघमारे आणि कु. अनामिका मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील इंगळे यांनी केले, अध्यक्षीय मनोगत डॉ. प्रतिभा भोरजार यांनी व्यक्त केले, तर डॉ. पवन तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
