40
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचे अमरावतीत उत्साहात उद्घाटन!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, सर्वोदय मंडळ अमरावती आणि विविध समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’चे भव्य उद्घाटन आज २ ऑक्टोबर रोजी पार पडले. हा नशाबंदी सप्ताह २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शहरात विविध जनजागृतीपर उपक्रमांनी राबवला जाणार आहे.
या अभियानाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी वक्त्यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मिती, युवकांमध्ये व्यसनांविषयी जनजागृती, नशेचे सामाजिक व कौटुंबिक दुष्परिणाम तसेच विवेकवादी आणि निरोगी समाजव्यवस्थेची गरज या विषयांवर सखोल विचार व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करत नशामुक्तीचा संदेश समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचा दृढ संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. तसेच नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पत्रकांचे वाटप करून पुढील १५ दिवसांच्या कृती कार्यक्रमाची दिशा निश्चित करण्यात आली.
या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रफुल्ल मंदा श्रीधर, प्रतिभा खापरे, डॉ. मंदा नांदुरकर, नरेंद्र धर्माळे, संजय खापरे, सचिन वासनिक, बबिता वानखडे, साहेबराव खंडारे, नरेंद्र तायवाडे यांच्यासह विविध समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान नशाबंदी, व्यसनमुक्ती आणि सामाजिक प्रबोधनासाठी शहरात विविध उपक्रम आयोजित केले जाणार असून, सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

