news
Home पिंपरी चिंचवड ‘जन्मभूमीत होणारा सन्मान अभिमानास्पद’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनेत्री टिना शर्मा घेवारे यांचे मनोगत!

‘जन्मभूमीत होणारा सन्मान अभिमानास्पद’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनेत्री टिना शर्मा घेवारे यांचे मनोगत!

निळू फुले नाट्यगृहात पिंपरी-चिंचवड कलाकार संघातर्फे आयोजन; सामाजिक अन् कला क्षेत्रातील योगदानाची दखल | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

टिना शर्मा घेवारे यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: वयाच्या १३ व्या वर्षापासून पिंपरी-चिंचवडच्या मातीत कलाकार म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या, “बोल मै हलगी बजाऊ क्या” फेम अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टिना शर्मा घेवारे यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने निळू फुले नाट्यगृह येथे आयोजित विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
आपल्या जन्मभूमीत ‘कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित होणे हा अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याची भावना टिना शर्मा घेवारे यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड शहरानेच आपल्याला कलाकार म्हणून ओळख दिली असून, या शहराचे आणि कलेचे ऋण फेडण्यासाठी कलाकारांसाठी निरंतर कार्य करणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सहकार्याचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “अण्णा बनसोडे यांचे कलाकारांच्या कामासाठी नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत असते. कलाकारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या प्रश्नांना पाठबळ देण्याची भूमिका ते सातत्याने बजावतात. त्यांच्या या सहकार्यामुळे कलाक्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी अधिक बळ आणि आत्मविश्वास मिळतो.”

डीजे (DJ) शो आणि अश्लील कार्यक्रमांविरोधात राबवलेली धडक मोहीम, कलाकारांच्या विविध प्रश्नांवर दिलेला लढा, तसेच कलाक्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन पिंपरी-चिंचवड कलाकार संघाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. या सन्मानामुळे भविष्यात आणखी ताकदीने काम करण्याची प्रेरणा मिळणार असून, कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी पुढेही कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
“कामाची दखल घेतली जाते तेव्हा आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. हा सन्मान माझ्यासाठी एक नवी जबाबदारी आहे,” असे सांगत टिना शर्मा घेवारे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड कलाकार संघ, रसिक प्रेक्षक, सहकारी कलाकार आणि सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!