19
मराठी लोकसंस्कृतीचा सुरेल ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ ने रसिकांना केले अंतर्मुख!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: संतवाणीतील भक्तिभावापासून ते पोवाड्याच्या जोशापर्यंत… लावणीच्या ठेक्यापासून ते भारूडाच्या सामाजिक आशयापर्यंत… आणि ओव्यांच्या भावविश्वापासून पंढरीच्या विठ्ठलापर्यंतचा सुरेल प्रवास ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ या नाट्य-संगीतमय आविष्कारातून रसिक प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेला.
अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रान्त बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ तसेच ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे मोरया थिएटर्सच्या वतीने ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ हा नाट्य-संगीतमय आविष्कार सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ‘विठ्ठल माझा मला पावलं का…’ या गीताने झाली. त्यानंतर पालखी सोहळा, गवळण, पोवाडा, दिंडीगीत, गोंधळ, रॅप, लावणी, पिंगळा, रिंगण आणि भारूड अशा विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणातून मराठीच्या विविध बोली, लोकपरंपरा आणि समृद्ध संगीतविश्वाचे दर्शन घडले. संतपरंपरेतील भक्तिरस, लोककलेतील उत्स्फूर्तता आणि मराठी मातीतील सांस्कृतिक वैविध्य यांचा सुरेल संगम साधत ‘अंतर्नाद’ने अभिजात मराठी भाषेच्या सांस्कृतिक वैभवाचा अनोखा अनुभव रसिकांना दिला.

सनई, हलगी, संबळ आणि ताशाकिंग सिराजभाई यांच्या ताशा वादनाच्या निनादात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. बँड पथकाने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे उत्साहपूर्ण सादरीकरण केले. ताशा, संबळ, हलगी आणि बँडच्या तालावर परिसरातील वातावरण भारावून गेले असून तरुणाईने या तालावर उत्स्फूर्तपणे थिरकत जल्लोष केला.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील सर्व आसने भरून गेल्याने कार्यक्रमाला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद लाभला. मराठी भाषा, साहित्य, लोककला आणि संस्कृतीशी जोडलेल्या या कार्यक्रमांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
सकाळी ९:०० वाजता ‘भिरभिर’ (एकांकिका – अथर्व थिएटर, चिंचवड) , सकाळी १०:०० वाजता ‘इन दि नेम ऑफ’ (एकांकिका – अस्मिता युवा मंच, पुणे) , दुपारी १२:३० वाजता ‘नियम व अटी लागू’ (नाटक – संकर्षण कऱ्हाडे अभिनीत) , सायंकाळी ५:०० वाजता ‘धरित्रीच्या लेकी’ , रात्री ९:३० वाजता ‘द फोक महाराष्ट्र – ओळख माझ्या महाराष्ट्राची’ (लोककलेचा भव्य सोहळा)
(सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांना मोफत प्रवेश आहे.)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
