news
Home पिंपरी चिंचवड ‘आईचे संस्कार अन् लतादीदींच्या आशीर्वादाने मराठी काव्याला स्वरबद्ध करू शकलो’; पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी उलगडला सांगीतिक प्रवास!

‘आईचे संस्कार अन् लतादीदींच्या आशीर्वादाने मराठी काव्याला स्वरबद्ध करू शकलो’; पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी उलगडला सांगीतिक प्रवास!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा विशेष सत्कार सोहळा; अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्याकडून संगीतसाधनेचा गौरव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मराठी भाषा मुळातच अभिजात; तिला वेगळ्या दर्जाची गरज नाही : पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “ज्या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीसारखे अजरामर ग्रंथ लिहिले गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुष राजे होऊन गेले, त्या भाषेला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची गरजच नाही, ती भाषा मुळातच अभिजात आहे,” असे गौरवद्गार संगीतसूर्य पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी काढले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’, ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ तसेच महापालिका व पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याला त्यांच्या पत्नी भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रतिनिधी तुषार झरेकर, किशोर बर्गडे यांच्यासह महापालिका अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “माझ्या बालपणी आईने वाचून दाखवलेल्या पुस्तकांमधून आणि सावरकरांच्या नाटकांतून कानावर पडलेल्या भाषेच्या सौंदर्याने मनावर खोल संस्कार केले. माझी मोठी बहीण स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाने व संस्कारांनी मी अभिजात मराठीतील काव्याला स्वरबद्ध करण्याचा प्रयत्न केला. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती.” संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ज्या भाषेला टेकून माऊली बसले, तिनेच असंख्य लोकांना ज्ञान व भावविश्व दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेला हा सत्कार माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या महान कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य महापालिकेला लाभले. आमच्या शब्दांना किनारा आहे, परंतु तुमच्या संगीताला व शब्दांना कोणताही किनारा नाही. आपण स्वतः एक अथांग समुद्र आहात.”
तसेच प्रास्ताविकात विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मंगेशकर कुटुंबाच्या सांगीतिक योगदानाचा आणि पंडितजींच्या संगीतसाधनेतील प्रयोगशीलतेचा गौरव केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी छायाचित्र प्रदर्शनाविषयी माहिती दिली. वृत्त छायाचित्रकारांनी टिपलेली एकच तसबीर संपूर्ण घटनेचे गांभीर्य आणि वास्तव मांडते. हे छायाचित्र प्रदर्शन ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात नागरिकांसाठी खुले राहणार असून सर्वांनी याला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले तर मानपत्राचे वाचन किरण गायकवाड यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!