29
विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेला ‘स्व. आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार’ प्रदान!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०४ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपळे गुरव येथील विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ‘स्व. आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा अनिल भोसले, उपाध्यक्ष शामराव हुलावळे आणि सेक्रेटरी संतोष भेगडे यांच्या हस्ते विजयराज पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष सूर्यकांत कुरूलकर, खजिनदार सखाराम वालकोळी, संचालक बाळासाहेब धावणे आणि व्यवस्थापक युवराज नलवडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विजयराज नागरी सहकारी पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर राहिली आहे. संस्थेच्या वतीने सातत्याने वृक्ष लागवड व संवर्धनाचे मोठे कार्य केले जाते. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार यांना राज्यस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे. संस्थेकडून ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग सभासद आणि विविध सामाजिक ट्रस्ट यांना देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. २४ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करणाऱ्या या संस्थेने सभासदांना सातत्याने १३ टक्के लाभांश दिला असून, दरवर्षी ऑडिटमध्ये ‘अ’ वर्ग प्राप्त केला आहे.
“हा पुरस्कार म्हणजे विजयराज परिवाराच्या २४ वर्षांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामाची पावती आहे. हा सन्मान सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या हजारो सभासदांचा आहे. भविष्यातही सभासदांच्या हितासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी आम्ही असेच काम करत राहू. संस्थेला सतत ऑडिट वर्ग ‘अ’ आणि १३ टक्के लाभांश देण्याची परंपरा आम्ही अशीच पुढे चालू ठेवू.”
— अरुण पवार (अध्यक्ष, विजयराज नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळे गुरव)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
