23

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ सेवेवर अखेर आरटीओची कडक बंदी; ५ वाहनांवर कारवाई, कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात विनापरवाना व अनधिकृतपणे सुरू असलेल्या ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ (Rapido Bike Taxi) सेवेला अखेर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) ब्रेक लावला आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चालवल्या जाणाऱ्या या बाईक टॅक्सी सेवेवर RTO ने तात्काळ प्रभावाने बंदी घातली असून, यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अचानक मोहीम राबवून शहरात बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या पाच बाईक टॅक्सींवर (दुचाकी) धडक जप्तीची कारवाई केली.
तसेच, कोणतीही वैध व्यावसायिक परवानगी नसताना अॅपद्वारे अशी बेकायदेशीर सेवा देणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या जबाबदार व्यवस्थापनावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आरटीओ प्रशासनाने दिले आहेत. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅप-बेस्ड कंपन्यांमध्ये मोठे धाबे दणाणले आहेत.
खाजगी (सफेद नंबर प्लेट) दुचाकींचा वापर करून बेकायदेशीर व्यावसायिक प्रवासी वाहतूक केली जात होती. अपघात घडल्यास प्रवाशांना कोणताही विमा किंवा कायदेशीर संरक्षण मिळत नाही. राज्य शासन व परिवहन प्राधिकरणाकडून बाईक टॅक्सी सेवेसाठी आवश्यक असलेले व्यावसायिक परवाने कंपनीने घेतलेले नव्हते. अनधिकृत बाईक टॅक्सींमुळे शहरातील अधिकृत रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर गदा येत असल्याने रिक्षा संघटनांनी याविरोधात सातत्याने तीव्र आंदोलने केली होती.
प्रवासी वाहतूक अधिक नियमबद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी ही कडक कारवाई करण्यात आली असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
“कोणत्याही अनधिकृत आणि विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांचा नागरिकांनी वापर करू नये. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरटीओची ही धडक तपासणी मोहीम शहरात अशीच सुरू राहील,” असा इशारा पिंपरी-चिंचवड आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
