54

ऑनलाइन ज्योतिष ॲप्सच्या जाहिरातींद्वारे नागरिकांची दिशाभूल व आर्थिक शोषण; सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा — रयत विद्यार्थी विचार मंचची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
पुणे/मुंबई प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: विविध ऑनलाइन ज्योतिष ॲप्सच्या जाहिरातींद्वारे नागरिकांची दिशाभूल केली जात असून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत आहे. तसेच या माध्यमातून अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले जात असल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रयत विद्यार्थी विचार मंचचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर ‘ॲस्ट्रोटॉक’ (Astrotalk) आणि तत्सम ऑनलाइन ज्योतिष ॲप्सच्या जाहिरातींचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. प्रेमसंबंध, विवाह, कौटुंबिक समस्या, करिअर आणि आर्थिक भविष्य यांसारख्या अत्यंत संवेदनशील विषयांवर अचूक मार्गदर्शन व भविष्यकथन करण्याचे दावे या जाहिरातींमध्ये केले जातात.
विशेष म्हणजे, प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री, लोकप्रिय रील स्टार्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स यांच्या माध्यमातून या व्यावसायिक सेवांचे प्रमोशन केले जात असल्याने, तरुण पिढीसह सर्वसामान्य नागरिकांवर याचा मोठा आणि नकारात्मक प्रभाव पडत असल्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
भविष्यकथनाच्या नावाखाली नागरिकांना खोट्या हमी देणे, दिशाभूल करणारे दावे करणे, त्यांच्या मनात भीती निर्माण करून आर्थिक रूप से पैसे खर्च करण्यास प्रवृत्त करणे किंवा कायद्याने प्रतिबंधित असलेल्या अंधश्रद्धाजन्य प्रथांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणे, असे प्रकार वेगाने वाढत आहेत.
या प्रकारांमुळे नागरिकांचे अवाजवी आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या मानसिक आरोग्यावर व निर्णयक्षमतेवरही गंभीर विपरीत परिणाम होत असल्याचे संतोष शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करताना खालील कायद्यांच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम, २०१३ , ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ मधील लागू तरतुदी
कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधित ॲप्सचे संचालक, जाहिरात एजन्सी, जाहिरातींमध्ये पैसे घेऊन सहभागी झालेले कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका रयत विद्यार्थी विचार मंचने घेतली आहे.
१. सक्षम यंत्रणेमार्फत संबंधित ऑनलाइन ज्योतिष ॲप्सच्या जाहिराती व व्यावसायिक दाव्यांची निष्पक्ष चौकशी करणे.
२. प्रतिबंधित अंधश्रद्धाजन्य प्रथांचा प्रचार व प्रसार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ फौजदारी कारवाई करणे.
३. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अनुचित व्यापार पद्धतींविरोधात ग्राहक संरक्षण प्राधिकरणांतर्गत कठोर पावले उचलणे.
४. नागरिकांमध्ये डिजिटल व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती मोहीम राबविणे.
“नागरिकांच्या श्रद्धेचा, त्यांच्या भावनिक परिस्थितीचा आणि आर्थिक असुरक्षिततेचा काहींकडून पद्धतशीरपणे गैरफायदा घेतला जात आहे. शासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी,” असे आवाहन संतोष शिंदे यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
