37

संविधानाच्या प्रास्ताविका हटाव प्रकरणी सांगवीत बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस; नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २४ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख बेकायदेशीरपणे हटवल्याप्रकरणी शहरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटी आणि विविध पुरोगामी व सामाजिक संघटनांच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. जोपर्यंत संविधानाची प्रास्ताविका पूर्ववत बसवली जात नाही आणि या प्रकरणात जबाबदार असलेल्या नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आंदोलनादरम्यान भूमिका स्पष्ट करताना पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेद्र बनसोडे म्हणाले की, “पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे आंदोलनाला सुरवात करण्यास थोडा विलंब झाला असला, तरी आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेला हात लावण्याचा प्रकार हा लोकशाहीच्या मूल्यांना थेट बाधा पोहोचवणारा आहे. शहरात अशा कृत्यांना अजिबात थारा दिला जाणार नाही.” संविधान चौकात प्रास्ताविका पुन्हा बसवून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत म्हटले की, “चौकाचे सुशोभीकरण करण्याचे कारण पुढे करून हा शिलालेख हटवण्यात आला आहे. परंतु, त्यासाठी महापालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी, निधीची मंजुरी किंवा निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. केवळ पती संतोष कांबळे यांच्यावर कारवाई करून चालणार नाही, तर या निर्णयात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. संविधानाची प्रास्ताविका हा नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे.”
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. बी. शिंदे यांनीही, लोकप्रतिनिधी म्हणून संविधानाच्या शपथवर निवडून आलेल्या व्यक्तीकडूनच असे कृत्य होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, तृप्ती कांबळे यांच्यावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेद्र बनसोडे, विचारवंत मानव कांबळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, ‘आप’चे शशी बावनकर, स्वराज इंडियाचे प्रदीप पवार, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, बी. बी. शिंदे, अप्पा शिंदे, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, देवदत्त रानवडे, महिला नेत्या अनिता साळवे, अनिता सोनवणे, विलास सकट, विजय उदमले, विजय ओव्हाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
