news
Home पिंपरी चिंचवड ‘स्वच्छ व पर्यावरणपूरक शहरासाठी कचरा कमी करण्याचे पाऊल’; पिंपरी मनपाचा ‘रिड्यूस, रियुज, रिसायकल’ उपक्रम!

‘स्वच्छ व पर्यावरणपूरक शहरासाठी कचरा कमी करण्याचे पाऊल’; पिंपरी मनपाचा ‘रिड्यूस, रियुज, रिसायकल’ उपक्रम!

दिवाळीच्या साफसफाईतील जुने कपडे, पुस्तके, खेळणी व वस्तू जमा करण्याचे आवाहन; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पुढाकार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी’ — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम; वापरात नसलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता ‘आर.आर.आर.’ केंद्रांमध्ये देण्याचे महापालिकेचे आवाहन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: घरातील वापरात नसलेल्या, मात्र सुस्थितीत असलेल्या जुन्या वस्तूंचा पुनर्वापर व्हावा आणि त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात, या उदात्त उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ‘आर.आर.आर.’ (रिड्यूस, रियुज, रिसायकल – Reduce, Reuse, Recycle) केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दिवाळीच्या तोंडावर घराची साफसफाई करताना अडगळ ठरलेल्या वस्तू कचऱ्यात फेकून न देता नागरिकांनी जवळच्या आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

घराची साफसफाई करताना जुनी खेळणी, कपडे, पुस्तके, भांडी, फर्निचर तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसारख्या वस्तू अनेकदा निरुपयोगी समजून फेकून दिल्या जातात. यामुळे शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत हा उपक्रम राबविला जात आहे.
याबाबत बोलताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. घरातील वापरात नसलेल्या, मात्र चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता आर.आर.आर. केंद्रात जमा केल्यास त्या गरजू व्यक्तींच्या उपयोगी पडू शकतात. यामुळे कचरा कमी होईल, पर्यावरणाचे संवर्धन होईल आणि सामाजिक जबाबदारीही जपली जाईल. दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांनी व गृहसंकुलांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.”
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनीही, “आर.आर.आर. केंद्रांच्या माध्यमातून जुन्या वस्तूंना नव्याने उपयोगात आणण्याची संधी मिळून पर्यावरण रक्षणासोबत सामाजिक संवेदनशीलतेला चालना मिळते,” असे नमूद करत नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

नागरिक आपल्या घरातील खालील सुस्थितीतील साहित्य या केंद्रांवर देऊ शकतात. पुस्तके, वह्या व शालेय साहित्य, सुस्थितीतील कपडे, चादरी आणि पडदे, खेळणी व शैक्षणिक साधने, घरगुती साहित्य, भांडी व फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला आणि इतर पुनर्वापरयोग्य वस्तू

 

पिंपरी-चिंचवड शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत खालीलप्रमाणे केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रभाग १०, १४, १५, १९: कापसे उद्यान (मोरवाडी), आकुर्डी भाजी मंडई, संत तुकाराम महाराज उद्यान, श्रीधरनगर उद्यान. प्रभाग १६, १७, १८, २२: एसकेएफ कंपनीशेजारी (थेरगाव), हेगडेवार पूल (दर्शननगरी), धर्मराज चौक (रावेत), ज्योतिबा उद्यान (काळेवाडी). प्रभाग २, ५, ६, ८, ९: हेगडेवार क्रीडा संकुल (अजमेरा), धावडे वस्ती (भोसरी), संत सावता महाराज उद्यान (मोशी), संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल (पिंपळे गुरव). प्रभाग २५, २६, २८, व प्रभाग कार्यालय २९: लिनियर उद्यान (कोकणे चौक), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान (पिंपळे निलख), तानाजी कलाटे उद्यान (वाकड). प्रभाग ३, ४, ५, ७: मोशी चौक, दिघी जकात नाका, राजमाता जिजाऊ उड्डाणपूल (भोसरी). प्रभाग १, ११, १२, १३: वृंदावन (चिखली), भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान, रूपीनगर पोलीस चौकी, शनि मंदिर (सेक्टर २१). प्रभाग २१, २३, २४, २७: थेरगाव रुग्णालयाशेजारी (जगताप नगर), मोरू बारणे उद्यान (थेरगाव), पिंपरी गाव बसथांबा, आरोग्य कोठी (रहाटणी गावठाण). प्रभाग २०, ३०, ३१, ३२: छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई (संत तुकाराम नगर), सितांगण उद्यान, कै. काळुराम जगताप तलाव, जुनी सांगवी भाजी मंडई.

 

नागरिकांनी तसेच गृहनिर्माण संस्थांनी आपल्या घरातील वापरात नसलेल्या, परंतु चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू संकलित करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ७०३०९०१९९३ किंवा ९१६८६८४६७० या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा. लोकसहभागातून पुनर्वापराची साखळी अधिक मजबूत करून आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!