news
Home पिंपरी चिंचवड ‘फुटपाथ चोरांच्या मुजोरीमुळे काळेवाडीकरांचा जीव मुठीत’; प्रशासनाने ८ दिवसांत कारवाई न केल्यास प्रभाग कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा!

‘फुटपाथ चोरांच्या मुजोरीमुळे काळेवाडीकरांचा जीव मुठीत’; प्रशासनाने ८ दिवसांत कारवाई न केल्यास प्रभाग कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा!

'लोटस् इन' लॉजिंगच्या बेकायदेशीर अतिक्रमणावर नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया; 'ड' प्रभाग कार्यालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

काळेवाडीत फुटपाथ चोरांचा प्रताप! ‘लोटस् इन’ लॉजिंगच्या बांधकामासाठी सार्वजनिक फुटपाथच केला गायब; प्रशासन अन् ‘ड’ प्रभाग कार्यालय गप्प का?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या काळेवाडी परिसरामध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या मुजोरीचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीर नगर, काळेवाडी येथील हॉटेल राजरत्न शेजारी ‘लोटस् इन’ नावाच्या लॉजिंग इमारतीचे बांधकाम करताना सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी असलेला सार्वजनिक फुटपाथच पूर्णपणे गायब करण्यात आला आहे. ही केवळ अतिक्रमण किंवा फुटपाथ चोरी नसून महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच आहे, असा घणाघाती आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो शालेय विद्यार्थी, महिला, कामगार आणि ज्येष्ठ नागरिक ये-जा करत असतात. मात्र, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या स्वार्थासाठी थेट सार्वजनिक फुटपाथच हडप केल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून भररस्त्यातून चालावे लागत आहे. सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी रोजच एखादा मोठा अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
इतकी गंभीर समस्या निर्माण झाली असतानाही ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत का? त्यांना हा हडप केलेला फुटपाथ दिसत नाही का? असा संतप्त सवाल काळेवाडीतील नागरिक आणि पादचारी विचारत आहेत.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख श्री. युवराज भगवान दाखले यांनी ‘ड’ प्रभाग अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर सार्वजनिक मालमत्तेची चोरी आणि बेकायदेशीर अतिक्रमण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच हडप केलेला फुटपाथ मोकळा करून पूर्ववत नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी आक्रमक मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना युवराज दाखले म्हणाले की, “सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा मुजोर बांधकाम व्यावसायिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ८ दिवसांच्या आत कडक कारवाई केली नाही, तर शिवशाही शासन पक्ष आणि अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या वतीने ‘ड’ प्रभाग कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.”
प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, महापालिका आयुक्त आता या ‘फुटपाथ चोरां’वर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण काळेवाडीकरांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!