20

पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर; ताथवडेतील विद्यार्थ्यांनी दिला कचरा वर्गीकरण अन् स्वच्छतेचा संदेश!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २४ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: स्वच्छ आणि सुंदर शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी व्यापक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याद्वारे प्रभावी जनजागृती करण्यात आली. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता आणि प्लास्टिक बंदीचे महत्त्व नाट्यातून पटवून दिले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि स्वच्छता अभियानांतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ताथवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे सादरीकरण पार पडले.
उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी पथनाट्य सादर केले. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, सॅनिटरी वेस्ट व विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे स्वतंत्र व्यवस्थापन, रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, एकल वापर प्लास्टिकचा (Single-use plastic) वापर पूर्णपणे टाळणे. या विषयांवर नाट्यमय सादरीकरण करत स्वच्छ शहर घडवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले. लहान वयापासूनच मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवून त्यांच्या माध्यमातून हा संदेश घराघरांत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाला महापालिकेच्या ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहायक आरोग्य अधिकारी शांताराम माने आणि आरोग्य निरीक्षक कोमल फर्डे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नागरिकांनी आपल्या घरातील कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करूनच तो महापालिकेच्या घंटागाडीत द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
“स्वच्छ आणि सुंदर शहराची निर्मिती करण्यासाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबावर आणि समाजावर होतो. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सवयी प्रत्येकाने अंगीकाराव्यात.”— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“स्वच्छतेच्या सवयी लहान वयातच रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर होतो. विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचवावा. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहराची निर्मिती शक्य आहे.”— डॉ. प्रदीप ठेंगल (उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


