news
Home पिंपरी चिंचवड ‘देशाची अखंडता आणि नशामुक्त भारताच्या संदेशासह राष्ट्रीय एकता रॅलीचे पुण्यात आगमन’; डी. वाय. पाटील महाविद्यालयात उत्साही सोहळा!

‘देशाची अखंडता आणि नशामुक्त भारताच्या संदेशासह राष्ट्रीय एकता रॅलीचे पुण्यात आगमन’; डी. वाय. पाटील महाविद्यालयात उत्साही सोहळा!

पोलीस आयुक्तालयातील १०० हून अधिक रायडर्सचा सहभाग; सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘राष्ट्रीय एकता बाईक रॅली’चे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: देशाची राष्ट्रीय एकता, अखंडता आणि युवा पिढीमध्ये अंमली पदार्थांविषयी जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश घेऊन दक्षिण भारतातून निघालेल्या ‘राष्ट्रीय एकता बाईक रॅली’चे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रावेत येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या संकुलात या विशेष स्वागत सोहळ्याचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे डी. वाय. पाटील महाविद्यालय, रावेत येथे आगमन होताच पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्स्फूर्त जल्लोषात विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सचे स्वागत करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून रायडर्सवर पुष्पवृष्टी करून त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या वतीने पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, या रॅलीमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १०० हून अधिक बाईक रायडर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमानंतर पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला पुढील प्रवासासाठी सन्मानाने रवाना करण्यात आले.
ही राष्ट्रीय एकता बाईक रॅली देशाच्या विविध भागांतून प्रवास करत आगामी ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया, एकता नगर (गुजरात) येथे पोहोचणार आहे. देशाची अखंडता आणि बंधुभाव दृढ करण्यासोबतच तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. “अंमली पदार्थांना नाही, जीवनाला हो!” असा नारा देत प्रशासनाने रायडर्सना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

या भव्य सोहळ्यास पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) संदीप आटोळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, अमंलदार, विविध राज्यांतील रायडर्स आणि महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!