58

सांगवी फाटा भुयारी मार्गात जाहिरातींचे विद्रुपीकरण; सुसाट वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये संताप!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सांगवी फाटा येथील भुयारी मार्गामध्ये (Subway) भिंतींवर अनधिकृत जाहिराती चिकटवून हा परिसर पूर्णपणे विद्रुप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या भुयारी मार्गातून वाहने अत्यंत सुसाट वेगाने धावत असतात. या जाहिरातींवर चालकांचे लक्ष केंद्रित झाल्यास मोठी दुर्घटना किंवा भीषण अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
भुयारी मार्गाच्या भिंतींवर छोट्या-मोठ्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या संबंधित ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना वारંवार कळवूनही त्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. स्थानिक पातळीवर नेमकी कोठे तक्रार नोंदवावी, हेच नागरिकांना समजेनासे झाले आहे. लोकप्रतिनिधींनाही जनसामान्यांच्या या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील छोट्या-मोठ्या आणि अत्यंत संवेदनशील विषयांवर नेहमीच नागरिकांच्या बाजूने खणखणीत आवाज उठवणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (कै. अजितदादा पवार) तडफदार युवा नेते श्री. प्रदीप गायकवाड यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराची गंभीर दखल घेत, लवकरच महापालिकेचे उपायुक्त विक्रांत बगाडे यांना भेटून सविस्तर निवेदन देण्यात येणार आहे. भुयारी मार्गाच्या भिंतींवर विनापरवाना जाहिराती चिकटवणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि हा परिसर विद्रुपमुक्त करावा, अशी आक्रमक मागणी प्रदीप गायकवाड यांच्या वतीने करण्यात येणार आहे. प्रशासनाने अशा लहान-सहान परंतु नागरिकांच्या सुरक्षेशी जोडलेल्या संवेदनशील गोष्टींमधून तातडीने बोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
