41

संविधानाच्या सन्मानासाठी सांगवीत बेमुदत ठिय्या आंदोलनाचा पहिला दिवस; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: सांगवी येथील ऐतिहासिक संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाला कथितरीत्या बेकायदेशीरपणे हटवून त्या ठिकाणी तोडफोड केल्याच्या अत्यंत गंभीर घटनेच्या निषेधार्थ, तसेच स्मारकाची पूर्ववत पुनर्स्थापना आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या मुख्य मागणीसाठी गुरुवार, २२ ऑक्टोबरपासून संविधान चौक, सांगवी येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन माघारी न घेण्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते, पुरोगामी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि बहुसंख्येने संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले आहेत. संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात आल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी स्पष्ट केले.
सांगवी येथील संविधान चौकातील प्रास्ताविका स्मारक हटविण्याची आणि तोडफोडीची घटना अत्यंत संतापजनक व गंभीर आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी या बेकायदेशीर कृतीबाबत पोलीस आयुक्तांना लेखी कळविल्याचा संदर्भ देत, पोलीस प्रशासनाने व महापालिकेने या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.
संविधानाचा सन्मान आणि नागरिकांच्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, संविधानप्रेमी नागरिक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या ठिय्या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते व विचारवंत मानव कांबळे, सामाजिक चळवळीचे नेते मारुती भापकर, ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, सर्वहारा उत्कर्ष समितीचे बी.बी. शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शाहबुद्दीन शेख, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र भोसकर, हरीश शिंदे, वीरेंद्र गायकवाड, संदीप शिंदे, सूरज माने, सदाशिव तळेकर, डेनिस देवनसन, नवीलाल मुल्ला, कबीर मोहम्मद, हिराचंद जाधव, हरीश डोळस, बाबा गायसमुद्रे, मिलिंद बनसोडे, देवदत्त रानवडे, अनिता साळवे, अनिता सोनवणे, रितिका शर्मा, महावेद वाळुंजकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

