23

पिंपरी-चिंचवडमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग; ५० हजारांची खंडणी आणि शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाकडून बेड्या!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात सोशल मीडियाचा गैरवापर करून नागरिकांना विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडणे, कार्यालयात बदनामी करण्याची धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी उकळणे आणि महिला मैत्रिणीकडे शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने धडक कारवाई करत जेरबंद केले आहे.
हनुमान सुभाष खरात (वय ३५, सध्या रा. वासोली फाटा, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. वरूडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीविरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने ‘Ruchita Nikam93’ या नावाने इन्स्टाग्रामवर एक फेक (बनावट) आयडी तयार केला. त्यानंतर फिर्यादीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका मुलीचा प्रायव्हेट पार्टचा फोटो पाठवून फिर्यादीलाही स्वतःचा असाच फोटो पाठविण्यास भाग पाडले.
या प्रक्रियेनंतर आरोपीने त्यांच्यातील संभाषणाचा डेटा एका अनोळखी मोबाईल नंबरवरून व्हॉट्सॲपवर पाठवून, “तुझे प्रायव्हेट पार्टचे फोटो माझ्याकडे आले आहेत, ते तुझ्या ऑफिसच्या मोबाईलवर आणि पार्ट टाईम जॉबच्या ठिकाणी पाठवून देईन,” अशी धमकी दिली. फोटो व्हायरल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, फिर्यादीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर मेसेज पाठवून, “तुझा मित्र गणेशला त्रास होऊ द्यायचा नसेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अथवा पैसे टाक, नाहीतर वायसीएममधील माझ्या मित्रांकडून मारहाण करीन,” असे धमकावले. तसेच ‘Bhalchandra Aher’ नावाच्या फेसबुक अकाउंटवरूनही धमकीचे संदेश पाठवण्यात आले होते.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०८(३), ३५१(2), ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईल नंबरचा मागोवा घेतला.
खेड तालुक्यातील वासोली फाटा येथील एका खोलीत लपून बसलेल्या हनुमान खरात यास पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ४ हजार १३० रुपये किंमतीची एक मोटारसायकल, एक मोबाईल, एक पाकीट, आधारकार्ड व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी संत तुकारामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, रमेश गायकवाड, अंमलदार सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आणि दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने पार पाडली.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय क्षेत्रात कोणालाही अशा प्रकारे खंडणीची मागणी झाली असल्यास किंवा कोणी पीडित असल्यास, त्यांनी न घाबरता खंडणी विरोधी पथक अथवा संत तुकारामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
