news
Home पिंपरी चिंचवड ‘अयोग्य गोष्टींविरुद्ध नेहमी आवाज उठवा’; आकुर्डीतील पीसीसीओई कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरणावर मंथन!

‘अयोग्य गोष्टींविरुद्ध नेहमी आवाज उठवा’; आकुर्डीतील पीसीसीओई कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरणावर मंथन!

ॲड. परिक्रमा खोत व उद्योजिका सुजल शाह यांचे प्रेरणादायी विचार; विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ महिलांचा सहभाग | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व; ध्येय, नियोजन आणि आत्मविश्वासाने यश निश्चित’ — डॉ. कांचन देशपांडे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. आपण प्रथम आपले ध्येय ठरवून त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. सर्जनशीलतेचा वापर करून आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने प्रयत्न केले की यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन सिटी प्राईड स्कूलच्या प्राचार्य डॉ. कांचन देशपांडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCOE) मधील अंतर्गत तक्रार समितीच्या (Internal Complaints Committee) वतीने ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ महिलांनी आपले विचार मांडले.
“अनेक स्त्रिया कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नोकरी व उद्योग-व्यवसाय करतात. हे करताना त्यांना ताणतणावाचा सामना करावा लागतो. ही समाजव्यवस्था स्त्रियांशिवाय अपुरी आहे. कुटुंबात आणि व्यवसायात कामाचा योग्य समतोल साधताना स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.” – स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार

 

“जे तुम्हाला अयोग्य वाटते, त्याविरुद्ध नेहमी आवाज उठवला पाहिजे. केवळ चर्चा करून समानता येत नाही; जिथे गरज वाटेल तिथे संघर्ष करायला हवा. बदलाची खरी सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे.” – कायदेतज्ज्ञ ॲड. परिक्रमा खोत

 

“आपला मार्ग आपल्याला स्वतःच तयार करावा लागतो. आयुष्यात येणाऱ्या नकारात्मकतेला धैर्याने सामोरे जात नोकरी आणि वैयक्तिक आयुष्याचा उत्तम समन्वय साधता आला पाहिजे.” – उद्योजिका सुजल शाह (संचालक, न्यू एज फायर फायटिंग कंपनी)

 

या चर्चासत्रास पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे, अंतर्गत तक्रार समितीच्या उपाध्यक्ष सहा. प्रा. वृषाली भालेराव, अधिष्ठाता डॉ. शीतल भंडारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

प्रास्ताविक करताना अंतर्गत तक्रार समिती उपाध्यक्ष सहा. प्रा. वृषाली भालेराव यांनी सांगितले की, महिलांना वैयक्तिक आयुष्यात समतोल राखताना येणाऱ्या आव्हानांवर विचारमंथन व्हावे, यासाठी पीसीसीओईने हे खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. प्रा. शीतल भंडारी यांनी केले, सूत्रसंचालन स्नेहा कल्याणकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. सोनल गोरे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वी संयोजनात डॉ. वृषाली भालेराव व डॉ. शिल्पा मोटेगावकर यांनी सहभाग घेतला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!