53

सरदार गोरखोजी भापकर यांच्या ऐतिहासिक शिक्क्यांचे लोणी भापकर येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दिमाखात अनावरण!
लोणी भापकर विशेष प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
लोणीभापकर: मराठेशाहीत आपल्या पराक्रमाने इतिहास घडवणारे मातब्बर सरदार गोरखोजी भापकर यांच्या अठराव्या शतकातील ऐतिहासिक शिक्क्यांचे अनावरण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येथील ऐतिहासिक अमृतेश्वर भैरवनाथ मंदिरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. पुणे येथील ‘दख्खन इतिहास संशोधन संस्थेचे’ संशोधक निखिल भापकर आणि प्रदीप भापकर यांनी पुणे येथील पुरालेखागारातून या ऐतिहासिक शिक्क्यांचे संशोधन केले आहे.
मंदिरातील घट उठवून, देवाचा छबिना आणि आरती झाल्यानंतर या विशेष अनावरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाच्या शिक्क्यांचे प्रकाशन करण्यात आले. पहिला शिक्का “श्री अमृतेश्वर चरणी तत्पर गोरखोजी भापकर निरंतर” असा गोलाकार मजकूर असलेला शिक्का. दुसरा शिक्का “मोर्तब सूद” हा लेखनसीमेचा षटकोनी शिक्का.

या प्रसंगी मु. सा. काकडे महाविद्यालयातील इतिहास अभ्यासक प्रा. दत्तात्रय जगताप यांनी कागदपत्रांवरील शिक्क्यांचे महत्त्व, त्यांचे प्रकार आणि वापराची वैशिष्ट्ये उपस्थितांना समजावून सांगितली. ते म्हणाले, “छत्रपतींच्या परवानगीशिवाय शिक्का व मोर्तब कोणालाही वापरता येत नसे. शिक्का वापरणारा सरदार व त्याचे घराणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असे. त्यामुळे भापकर घराण्यासाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. या शिक्क्यातून गोरखोजी भापकरांचा श्री अमृतेश्वराप्रति असलेला समर्पित भक्तीभाव स्पष्ट होतो.”
इतिहासकारांच्या मते, गोरखोजी भापकर हे छत्रपती थोरले शाहू महाराजांचे मातब्बर सरंजामी सरदार होते आणि त्यांच्याकडे पाच हजार स्वारांची फौज होती. त्यांना बीड, माहूर व पाथरी येथील सरदेशमुखीच्या सरंजामाची सनद देण्यात आली होती. अनेक लष्करी मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप भापकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर भापकर यांनी मानले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी माजी सरपंच हनुमंतराव भापकर, दारासिंह भापकर, सोमेश्वर सहकार कारखान्याचे संचालक रवींद्र भापकर, शिवसेना (उबाठा) चे तालुकाध्यक्ष हनुमंतराव भापकर, पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, दख्खन इतिहास संशोधन संस्थेचे विश्वस्त अतुल रणवरे, उदयसिंह भापकर, जयदीप भापकर, शिवराम भापकर, सुनीलराजे भोसले यांच्यासह लोणी भापकर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. अनावरण सोहळ्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

