news
Home पिंपरी चिंचवड ‘पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात अवैध शस्त्रांविरोधात कठोर मोहीम सुरू’; चाकणमधून दोन सराईत जेरबंद!

‘पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात अवैध शस्त्रांविरोधात कठोर मोहीम सुरू’; चाकणमधून दोन सराईत जेरबंद!

यश शिंदे व प्रज्वल जाधव यांच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्टल जप्त; फरार फारूख पठाणसह तिघांवर दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळजनक कारवाई; अवैध पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका धडक कारवाईत ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.
यश अनिल शिंदे (वय २२, रा. मु. पो. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे) आणि प्रज्वल सुधीर जाधव (वय २२, रा. मु. पो. जाधववाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा तिसरा साथीदार फारूख अन्सार पठाण (वय २५, रा. बालाजीनगर, चाकण, पुणे) याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, निलेश जाधव आणि संदीप गंगावणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काही रेकॉर्डवरील आरोपी पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अवैध शस्त्र बाळगून वावरत आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, सहायक उपनिरीक्षक सुनील कानगुडे आणि विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक २२/१०/२०२६ रोजी पहाटे ००:४० वाजण्याच्या सुमारास चाकण जवळील मरोळ/नाणेकरवाडी परिसरातील माऊली पार्क कमानीजवळ सापळा रचून आरोपी यश अनिल शिंदे व प्रज्वल सुधीर जाधव यांना घेराव घालून ताब्यात घेतले.

संशयित आरोपी यश अनिल शिंदे याच्या अंगझडतीत ५० हजार रुपये किमतीचे १ जिवंत/लोखंडी पिस्टल जप्त करण्यात आले. या शस्त्राबाबत विचारपूस केली असता, सदर पिस्टल सोबत असलेला साथीदार प्रज्वल सुधीर जाधव याने दिल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर प्रज्वल जाधव याची कसून चौकशी केली असता, त्याच्या मित्राने म्हणजेच फारूख अन्सार पठाण याने हे अवैध शस्त्र आपल्याला दिल्याची कबुली त्याने दिली.
याप्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींची वायसीएम (YCM) रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी दक्षिण चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात यापूर्वीही शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, चंद्रकांत जाधव, निलेश जाधव आणि संदीप गंगावणे यांच्या पथकाने पार पाडली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!