29

संविधान प्रास्ताविका विदारक घटना: सांगवीतील काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर असल्याचा नेत्यांचा गंभीर आरोप!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प कथितरीत्या मोडतोड करून हटविल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज शनिवार (दि. २४) तिसरा दिवस आहे. आंदोलनादरम्यान बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेद्र बनसोडे यांनी, आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी आंदोलन स्थळी काही माथेफिरूंचा वावर वाढल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच संविधानाचे शिल्प पूर्ववत स्थापित करेपर्यंत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी भूमिकை स्पष्ट करताना शहराध्यक्ष नरेद्र बनसोडे म्हणाले की, “संविधान चौकातील प्रास्ताविकेचे शिल्प बेकायदेशीरपणे हटविण्यात आले आहे. नवीन शिल्प उभारण्याचे कारण पुढे केले जात असले, तरी त्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश किंवा जुने बांधकाम हटवण्याची कोणतीही परवानगी महापालिकेने दिलेली नाही. खुद्द महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाने हे काम बेकायदेशीर असल्याचे पोलीस आयुक्तांना कळविले आहे. मात्र, आंदोलनाला दाबण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी काही माथेफिरू समाजकंटक आंदोलन स्थळी चकरा मारत आहेत.”
तसेच, संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप एफआयआरची (FIR) अधिकृत प्रत मिळालेली नाही. त्यामुळे लावण्यात आलेल्या कलमांची माहिती स्पष्ट झालेली नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतीकाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर योग्य त्या फौजदारी कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, असे ते म्हणाले.
युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिकेत सोनवणे यांनी आक्रमक भूमिका मांडताना म्हटले की, “संविधान हे केवळ कागदावरील मजकूर नसून प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान व सन्मान आहे. याच संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे यांनी या प्रकाराबद्दल सार्वजनिकरीत्या दिलगीरी व्यक्त करून नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या नगरसेव पदाचा राजीनामा दिला पाहिजे.” शिल्पाची पुनर्स्थापना होईपर्यंत युवक काँग्रेस संपूर्ण ताकदीने या आंदोलनाच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या धरणे आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेद्र बनसोडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे विभागीय उपक्रम निरीक्षक तौफिक हंडी, पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयिका समिता गोरे, काँग्रेस नेते राहुल वंजारी, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष रवी नांगरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शाबुद्दीन शेख, प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव अनिकेत सोनवणे, स्वराज इंडियाचे प्रदीप पवार, ‘आप’चे जितू बावनकर, संविधान जागर अभियानाचे श्रीकृष्ण कुलकर्णी, शुभम हल्ले, स्नेहल शुभांगी, ऋषी कापडी, ज्येष्ठ गायक अशोक गायकवाड यांच्यासह बी. बी. शिंदे, हरीश डोळस, डेनिस देवनसन, रिजवान खान, अमरपालसिंग पोथिवाल, रामकिसन माने, सुरज माने, बाबा गायसमुद्रे, शुभम थोरात, सदाशिव तळेकर, हिराचंद जाधव, आदिनाथ जावीर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
