43

‘दुष्काळामुळे स्थलांतरित कामगारांना बोनस नको, प्रत्यक्ष काम द्या!’ — कामगार नेते काशिनाथ नखाते यांची आक्रमक मागणी
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: महाराष्ट्रातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाला बसत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या हजारो कामगारांना पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अशा कठीण परिस्थितीत केवळ कागदी योजना किंवा रोजगार मेळाव्यांचे दिखावे न करता सरकारने या स्थलांतरित कामगारांना प्रत्यक्ष काम उपलब्ध करून देऊन त्यांच्या जगण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारावी, अशी आक्रमक मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
ग्रामीण भागात शेतीचे उत्पन्न घटल्याने आणि रोजगाराची साधने संपल्याने हजारो मजूर व तरुण शहरांकडे धाव घेत आहेत. मात्र, शहरात आल्यानंतरही कामाचा पत्ता नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. “निवडणुका किंवा घोषणांमध्ये दोन कोटी रोजगारांची आश्वासने दिली जातात; मात्र आज संकटात सापडलेल्या या कष्टकऱ्यांना प्रत्यक्ष काम कोण देणार? ‘कोणी काम देता का काम?’ अशी आर्त हाक मारणाऱ्या मजुरांचे प्रश्न लोकप्रतिनिधी व प्रशासनाने संवेदनशीलतेने हाताळले पाहिजेत,” असा टोला नखाते यांनी लगावला.
या पार्श्वभूमीवर काशिनाथ नखाते यांनी चिखली, चिंचवड, काळेवाडी आणि डांगे चौक येथील कामगार नाक्यांवर (मजूर अड्डे) प्रत्यक्ष जाऊन कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्थलांतरित मजुरांसाठी विशेष रोजगार अभियान राबवणे आणि सर्व कामांच्या संधी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शेतीचे संपूर्ण नुकसान झाल्याने गावात हाताला काहीच काम उरले नाही. त्यामुळे शेवटी कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी यवतमाळ सोडून इकडे आलो, पण इथेही कामाचा शोध घ्यावा लागत आहे.”— सदाशिव राठोड (स्थलांतरित मजूर, यवतमाळ)
“आठवड्यापूर्वी पुण्यात आलो होतो, तिथे काम मिळाले नाही म्हणून आता पिंपरी-चिंचवडमध्ये आलो आहे. इथेही लवकर काम उपलब्ध झाले नाही, तर जगणे अत्यंत अवघड होईल.”— हरिभाऊ उघडे (स्थलांतरित मजूर, बुलढाणा)
या संवाद दौऱ्यात कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रदेश संघटक भास्कर राठोड, उपाध्यक्ष राजेश माने, समाधान लोखंडे, लाला राठोड, विनोद गवई, अनिता माने, अंजना शिंदे यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“दुष्काळामुळे गावे सोडून शहरात आलेल्या या मजुरांना कोणत्याही तात्पुरत्या बोनस किंवा फसव्या घोषणांपेक्षा नियमित रोजगाराची गरज आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि मूलभूत गरजांचा विचार करून सरकारने तातडीने ठोस धोरण आखावे, यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ सातत्याने लढा देईल,” असा पुनरुच्चार काशिनाथ नखाते यांनी केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
