
अमरावतीत ‘एकम’च्या गौसेवा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हून अधिक मुलांचा पालकांसह उत्साही सहभाग!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज
अमरावती: लहान मुलांमध्ये भारतीय संस्कृती, प्राणिमात्रांप्रती करुणा आणि सेवाभावाचे मोलाचे संस्कार रुजवण्याच्या उद्देशाने ‘एकम’ या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील श्री गोरक्षण संस्था येथे एका विशेष गौसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ५० हून अधिक मुलांनी आपल्या पालकांसह अत्यंत उत्साहाने व आनंदाने सहभाग घेतला.
उपक्रमाची सुरुवात परंपरेनुसार मुलांचे स्वागत करून व त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देऊन झाली. त्यानंतर श्री गोवर्धन/श्रीकृष्ण मंदिरात प्रत्येक मुलाला आरती करण्याची दुर्मिळ संधी देण्यात आली.

या प्रसंगी पंडित उपेंद्रजी पांडे यांनी उपस्थित मुलांना व त्यांच्या पालकांना भारतीय संस्कृतीत गोमातेचे असलेले अनन्यसाधारण स्थान आणि गौसेवेचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनपर सत्रानंतर मुलांनी गोमातेची भावपूर्ण आरती केली, लहान वासरांसोबत मनसोक्त वेळ घालवला आणि आपल्या पालकांच्या मदतीने गायींना ताज्या भाज्या, ढेप व हिरवा चारा खाऊ घालून प्रत्यक्ष गौसेवेचा आनंद लुटला.

‘एकम’चे संस्थापक आदित्य बंग आणि अभिषेक डागा यांच्या मार्गदर्शनाखाली या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी श्री गोरक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, तसेच मधुरम प्री स्कूल (SVF) च्या संचालिका कुंजन वेद आणि विधी नावंदर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास अमोल अग्रवाल, अनुराग जाजू आणि चिंतन पासड यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकम टीममधील गायत्री राठी, श्रेया जाजू, सुमित मोहोड, राधिका राऊत, स्नेहल चांडक, पवन खोब्रागडे आणि स्वराज अडगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मधुरम प्री स्कूलच्या स्वयंसेविका प्राजक्ता मडावी, रश्मी कावळकर, रश्मी जोध, नम्रता ठाकरे, अर्चना पवार आणि समृद्धी चौधरी यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
लहान वयातच मुलांमध्ये दया, करुणा आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करण्याचा ‘एकम’चा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव


