पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात एकाच दिवसात गुन्हेगारीचा उच्चांक; पिंपळे गुरव येथे एटीएम गॅस कटरने कापून २० लाखांची चोरी, तर चिखली व शिरगावमध्ये गंभीर गुन्हे दाखल!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी नोंदवलेल्या गुन्ह्यांची दैनिक प्रेसनोट समोर आली असून, एकाच दिवसात घडलेल्या गुन्ह्यांच्या सत्रामुळे शहरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम गॅस कटरने लुटून २० लाख ३० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची मोठी घटना समोर आली आहे. याशिवाय चिखली परिसरात जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता व पिस्तुलाने हल्ल्याचे प्रयत्न, हुक्का पार्लरवर कारवाई आणि एमडी ड्रग्स बाळगणाऱ्यांवर दंडात्मक कारवायांचे सत्र पाहायला मिळाले आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला. १७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेपूर्वीच्या सुमारास चोरांनी ‘हायसुंग’ (HYOSUNG) कंपनीचे एटीएम मशिन गॅस कटरच्या साहाय्याने कापून व जाळून पूर्णपणे उद्धवस्त केले. मशिनमधील २०,३०,८०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. विशेष म्हणजे, गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला होता. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोउपनि भालेराव अधिक तपास करत आहेत.
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. रुपीनगर, तळवडे येथील माऊली हॉटेलसमोर फिर्यादी मेहबुब लियाकत शेख यांना “तू डीसीपींना का फोन करायला लागलास” असे म्हणत आरोपी अभिन कबीर शेख याने पिस्तूल पोटास लावून “तुमको ठोक दूंगा, तेरा बेटा उठाऊंगा” अशी धमकी दिली. याप्रकरणी आर्म अॅक्टसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवाळेवस्ती, चिखली येथील शिवशक्ती किराणा दुकानासमोर जुन्या भांडणाच्या रागवरून आरोपींनी फिर्यादीवर लोखंडी कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवून पळून जात असताना आरोपींनी पाठलाग करून जिवे मारण्याची धमकी दिली.
शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच रात्री अवैध अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन जणांना जेरबंद केले. परंदवडी ब्रिजजवळ हायवे रोडच्या कडेला छापा टाकून आरोपी हर्षल गोविंदराव जाधव (रा. सोमाटणे फाटा), निस्रील उत्तम बेळगट आणि प्रतिक उर्फ सोडम उर्फ बाबा अंतमवान पवार (रा. काळेवाडी) यांच्या ताब्यातून ११.९३० ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोउपनि केंद्रे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बावधन परिसरातील वलासो हॉटेल (मानस तलाव शेजारी, भुकूम) येथे विहित नियमांचे उल्लंघन करून हुक्क्याचा वेगळा झोन न करता ग्राहकांना जेवणास व हुक्क्यास एकत्र बसवून तंबाखूजन्य व ज्वालाग्राही पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून ७१ हुक्का पॉट, १ हुक्का पाईप व इतर साहित्य असा एकूण ३,०७० रुपयांचा माल जप्त केला असून, हॉटेल चालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चाकण व मोशी परिसर संतोषनगर (वाकी) येथे घराच्या पार्किंगमधून हँडल लॉक केलेल्या तब्बल १ लाख १० हजार रुपये किंमतीच्या दोन हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. भोसरी एमआयडीसी जॉब व्यवस्थित करत नसल्याच्या कारणावरून कंपनीत सहकाऱ्याने हातातील जॉब थेट कपाळावर मारून जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच उधारीवर कोल्ड्रिंक न दिल्यामुळे लोखंडी पाईपने हॉटेल व्यावसायिकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असून, पोलिसांनी गस्त व कडक कारवाई वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
