news
‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!‘प्रत्येक पात्र फेरीवाल्याला कायदेशीर संरक्षण आणि सन्मानाने व्यवसाय करण्याचा अधिकार मिळवून देणार’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांची ग्वाही!‘दिवाळीच्या सुट्टीत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची होणार झाडाझडती’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा!‘करदात्या नागरिकांच्या हक्काची कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना इशारा!‘लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; भटक्या श्वानांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष चालणार नाही’; उपमहापौर बाबर आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!

‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!

महिन्यांचे प्रलंबित विषय आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा घोळ संपवण्यासाठी प्रशासनाची धावपळ; नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अबब… २० नोव्हेंबरला एकाच दिवसात तब्बल तीन सर्वसाधारण सभा; हा महापालिकेचा ढिसाळ कारभार की राजकीय खेळी?

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महापालिकेच्या मागील दोन सर्वसाधारण सभा विविध कारणांमुळे तहकूब करण्यात आल्या होत्या. मात्र, आता आगामी २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात तब्बल तीन सर्वसाधारण सभा उरटवण्याचा घाट घातल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना मोठे उधाण आले आहे. हा महापालिकेचा ढिसाळ कारभार म्हणावा की सोयीस्कर राजकीय खेळी, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिकांमधून आणि राजकीय जाणकारांकडून विचारला जात आहे.

पिंपरी-चिंचवड मनपा वर्तुळात मागील काही महिन्यांपासून सभांच्या तहकुबीचे सत्र सातत्याने पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षातील अंतर्गत गटबाजी, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा घोळ आणि इच्छुकांची वाढलेली संख्या यामुळे मागील काही महिन्यांतील सर्वसाधारण सभा वेळोवेळी पुढे ढकलण्यात आल्या किंवा गदारोळामुळे तहकूब करण्यात आल्या. कधी राजकीय आचारसंहिता, तर कधी विविध विषयांवर एकमत न झाल्यामुळे सभांचे कामकाज वारंवार लांबणीवर पडले. या सगळ्या गोंधळात स्वीकृत नगरसेवक आणि क्षेत्रीय समिती सदस्यांच्या निवडीचा जवळपास ९ महिन्यांचा कालावधी वाया गेला असून, नगरसेवकपदाच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

मागील दोन तहकूब सभांचे प्रलंबित विषय आणि नियमित विषय एकत्र करून आता २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी एकापाठोपाठ एक अशा तीन सर्वसाधारण सभा पार पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यावरून विरोधक आणि नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  महापालिकेच्या सभेत शहराच्या विकासावर, नागरιक समस्यांवर आणि कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांवर सखोल चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, जर एकाच दिवशी तीन सभा उरटवल्या जात असतील, तर नगरसेवकांना जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी पुरेशी संधी मिळणार का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.  विरोधकांना बोलू न देणे, वादग्रस्त विषय घाईघाईने मंजूर करून घेणे किंवा पक्षांतर्गत राजकारण आणि तडजोडी लपवण्यासाठी सभांची अशी गुंडाळणी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड हे देशातील एक अत्यंत सधन, औद्योगिक आणि वेगाने विकसित होणारे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, महापालिकेच्या सभागृहात शहराच्या विकासात्मक प्रश्नांपेक्षा जर केवळ राजकीय तडजोडी, गटबाजी आणि सभा तहकूब करण्याचे खेळ चालत असतील, तर सामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होते.

आगामी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एकाच दिवसाच्या या तिन्ही सर्वसाधारण सभांमध्ये नेमके कोणते वादग्रस्त आणि महत्त्वाचे निर्णय मंजूर केले जातात आणि यावर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागून आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!